वारक-यांची पंढरीची वाट खडतर : नगर-करमाळा रस्ता खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:13 PM2019-06-19T12:13:40+5:302019-06-19T12:13:46+5:30

‘पाऊले चालती, पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडुनिया गाठ’ असे म्हणत वारकरी पंढरीकडे निघाले आहेत. अनेक पालख्या, दिंड्या नगरमार्गे पंढरपूरकडे जातात.

Warkari Pandhari Route: Nagar-Karmala road | वारक-यांची पंढरीची वाट खडतर : नगर-करमाळा रस्ता खड्ड्यात

वारक-यांची पंढरीची वाट खडतर : नगर-करमाळा रस्ता खड्ड्यात

Next

अहमदनगर : ‘पाऊले चालती, पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडुनिया गाठ’ असे म्हणत वारकरी पंढरीकडे निघाले आहेत. अनेक पालख्या, दिंड्या नगरमार्गे पंढरपूरकडे जातात. मात्र पंढरीकडे जाणारा नगर-करमाळा-टेंभुर्णी-पंढरपूर हा रस्ताच खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे यंदा वारकऱ्यांची पंढरीची वाट खडतर होणार आहे.
आषाढी एकादशी १२ जुलै रोजी आहे. राज्यातून अनेक पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान सुरू झाले आहे. वारकऱ्यांमुळे आषाढीचा हा सोहळा जागतिक पातळीवर गेला आहे. राज्याच्या विविध भागातून पालख्या पंढरपूरकडे जातात. काही पालख्या अहमदनगरमार्गे पंढरपूरकडे जातात.
अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी-पंढरपूर असा जाणारा राज्यमार्ग सध्या खड्ड्यात आहे. हा राज्यमार्ग चौपदरी करण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतला होता. मात्र या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाल्याने या मार्गाचे काम रखडले. हा मार्ग देहू-आळंदीच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी मागणी होत आहे. दरम्यान खासदार डॉ. सुजय विखे यांनीही गत आठवड्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बैठकीत रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. मात्र या बैठकीत त्यांनाही वारकºयांच्या या रस्त्याचा विसर पडला.

या मार्गाने जाणा-या दिंड्या
नगर-करमाळा मार्गे जाणा-या दिंड्या अनेक आहेत. मुक्ताबाईंची दिंडी, संत निवृत्ती नाथांची दिंडी, संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी (नेवासा), सखाराम महाराज संस्थानची दिंडी (अमळनेर), भद्रा मारुती संस्थानची पायी दिंडी (खुलताबाद), गंगागिरी महाराज यांची पायी दिंडी, शनी महाराजांची दिंडी (शिंगणापूर), श्रीक्षेत्र देवगड संस्थानहून श्रीसमर्थ सदगुरु किसनगिरी बाबा पालखी यांचा समावेश आहे. अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यातील दिंड्या याच मार्गावरून जातात.

नगर-करमाळा-टेंभुर्णी रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. कर्जत, श्रीगोंदा, पारनेर आणि नगर अशा चार प्रांताधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निविदा, कंपनी व रस्त्याचे काम अशी प्रक्रिया आहे. १०० कि.मी.चा हा रस्ता १८०० कोटी रुपये खर्चाचा आहे.
सध्या हा रस्ता सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे, असे राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी सांगितले. तर आमच्या अखत्यारित रस्ता आहे. सध्या या रस्त्यावरील खड्डे बुजविता येतील. मात्र नव्याने काम करणे शक्य नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गोपीनाथ मोहिते यांनी सांगितले.

रस्त्याची दुरुस्ती व्हावी, तसेच आळंदी-पंढरपूर, पैठण-पंढरपूर, शेगाव-पंढरपूर या रस्त्याप्रमाणेच नगर-करमाळा-पंढरपूर मार्गाला पालखी मार्गाचा दर्जा देण्यात यावा. तसेच दिंड्यांच्या काळात या मार्गावर पाणी, शौचालये, आरोग्य, अग्निशमन वाहन, वाहतूक नियंत्रक अशा सोयी -सुविधा द्यावात. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे. -ह.भ. प. विश्वनाथ राऊत, अध्यक्ष, जिल्हा वारकरी संघ

Web Title: Warkari Pandhari Route: Nagar-Karmala road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.