संगमनेर तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:50+5:302021-01-16T04:24:50+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात आली होती. प्रशासनाकडून १ हजार ८०० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात आली होती. प्रशासनाकडून १ हजार ८०० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच फेस शिल्ड, तीन मास्क, दोन हॅण्डग्लोजचे वितरण करण्यात आले होते. तसेच मतदानाच्या दिवशी सकाळी सहापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातच थांबावे, असा आदेश तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांनी काढला होता. मात्र, तालुक्यातील देवगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सकाळी अकराच्या सुमारास बंद असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तहसीलदार निकम यांनी नोटीस बजावली.
...............
एक उमेदवार कोरोना पाॅझिटिव्ह
संगमनेर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एका उमेदवाराला कोरोनाची लागण झाल्याचे कोरोना चाचणीतून समोर आले. या कोरोना पाॅझिटिव्ह उमेदवाराच्या विजयासाठी कार्यकर्तेच मेहनत घेत असल्याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली होती.
..........
थोरात-विखे या दोन्ही गटांकडून विजयाचे दावे
संगमनेर तालुक्यातील २६ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. या मतदारसंघातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शांततेत, उत्साहात मतदान पार पडले. मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. १४ गावांतील २८१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा गावपातळीवर पणाला लागली आहे. १२ गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे या दोन गटांत चुरस पाहायला मिळाली. या दोन्ही गटांच्या गावपातळीवरील स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी विजयाचे दावे केले.