शेतीपंपाची सव्वाचार कोटींची थकबाकी वसुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:20 AM2021-03-05T04:20:23+5:302021-03-05T04:20:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : तालुक्यात महावितरण कंपनीकडून ‘महावितरण कृषिपंप वीज धोरण - २०२०’ या योजनेंतर्गत ५५ गावांमधील ५ ...

Recovery of arrears of Rs | शेतीपंपाची सव्वाचार कोटींची थकबाकी वसुल

शेतीपंपाची सव्वाचार कोटींची थकबाकी वसुल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : तालुक्यात महावितरण कंपनीकडून ‘महावितरण कृषिपंप वीज धोरण - २०२०’ या योजनेंतर्गत ५५ गावांमधील ५ हजारांहून अधिक शेतीपंपाच्या ग्राहकांकडून ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या पाच महिन्यांच्या कालावधीत ४ कोटी २४ लाख ३९ हजार इतक्या रकमेची वसुली करण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे आहेत. त्यापैकी कोपरगाव महावितरण कार्यालयांतर्गत तालुक्यातील एकूण ५५ गावे आहेत. तर उर्वरित २४ गावे ही राहाता उपविभागीय कार्यालयांतर्गत येतात. कोपरगावातील ५५ गावांमध्ये एकूण १८ हजार ७९० शेतीपंपाचे ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांची एकूण थकबाकी सुमारे १९५ कोटी ३४ लाख इतकी आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी राज्य शासनाने शेतीपंपाच्या थकीत ग्राहकांसाठी ‘महावितरण कृषिपंप वीज धोरण - २०२०’ ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून बिलाच्या मूळ थकबाकीतून व्याज व दंड माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थकबाकी भरताना ५० टक्केच रक्कम भरावी लागणार आहे. तालुक्यातील शेतकरी या योजनेत सहभागी होऊन आपली थकबाकी भरत आहेत.

........

ब्राम्हणगावात सर्वाधिक ४६ लाखांची वसुली

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगावातील सर्वाधिक ३६० ग्राहकांनी फेब्रुवारीअखेर या योजनेत सहभागी होत, सुमारे ४६ लाख १५ हजार ८२३ इतकी थकबाकी भरली आहे. तर याउलट चासनळी गावातील फक्त दोनच शेतकऱ्यांनी सहभागी होत सर्वात कमी ३० हजार इतकी थकबाकी भरली आहे.

.............

या योजनेंतर्गत केलेल्या वसुलीचा फायदा हा त्या-त्या गावातील ग्रामपंचायतीला होणार आहे. या जमा झालेल्या वीजबिलाच्या रकमेतून ३३ टक्के रक्कम ही त्या गावातील नवीन जोडणी तसेच पायाभूत सुविधा व विद्युत प्रणाली सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर विभागीय कार्यालयाद्वारे वापरण्यात येणार आहे. तसेच ३३ टक्के रक्कम ही त्या तालुक्यातील खासदार, आमदार यांनी सुचविलेल्या महावितरणच्या कामासाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत उत्फूर्तपणे सहभाग नोंदवून महावितरणला सहकार्य करावे.

- दिनेश चावडा, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, कोपरगाव

Web Title: Recovery of arrears of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.