महापौर निवडणुकीची उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:41+5:302021-06-22T04:15:41+5:30

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीमुळे येथील महापौर पदाचा गुंता वाढला आहे. निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो, अशी ...

The mayoral election is in full swing | महापौर निवडणुकीची उत्सुकता शिगेला

महापौर निवडणुकीची उत्सुकता शिगेला

googlenewsNext

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीमुळे येथील महापौर पदाचा गुंता वाढला आहे. निवडणूक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. परंतु, निवडणुकीचे सूत्र अजून तरी ठरलेले नाही. त्यामुळे बहुमताचा जादुई आकडा कोण गाठणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महापालिकेत सध्या भाजप-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाल ३० जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी महापौर पदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव मनपाच्या नगरसचिव कार्यालयाने विभागीय आयुक्तांना पाठविलेला आहे. परंतु, विभागीय आयुक्तांकडून अद्याप कार्यक्रम जाहीर केला गेला नाही. गतवेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाचा महापौर झाला. सर्वाधिक संख्याबळ असूनही सेनेला सत्तेतून बाहेर राहावे लागले. यावेळी मात्र सेनेने सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतला आहे, पण महाविकास आघाडी आडवी आली. त्यामुळे मातोश्रीवरून निरोपाचा फोन अजून खणखणला नाही. राज्यात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. परंतु, नगरमध्ये सेना व राष्ट्रवादी एकत्र येईलच, याची खात्री देता येणार नाही. आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. परंतु, आमदार जगताप हे सध्या वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे ते एनवेळी काय भूमिका घेतील, हे आताच सांगणे कठीण आहे.

महापौर पदासाठी ३४ नगरसेवकांचा पाठिंबा लागणार आहे. सेनेकडे २३ नगरसेवक आहेत. सेनेला बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आणखी ११ नगरसेवकांची गरज पडणार आहे. राष्ट्रवादीकडे १९ नगरसेवक आहेत. सेना व राष्ट्रवादी एकत्र आल्यास बहुमतासाठी अन्य पक्षांची गरज पडणार नाही. परंतु, सेना व राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर सहजासहजी एकत्र येतील, असे वाटत नाही. त्यामुळे ऐनवेळी फाटाफूट होऊ शकते, हे गृहीत धरूनच सेनेची वाटचाल सुरू आहे. अशीच आवस्था राष्ट्रवादीचीही आहे. वरिष्ठांनी आदेश दिल्यास राष्ट्रवादीही निवडणुकीच्या मैदानात उतरू शकते. तशी राष्ट्रवादीने तयारी ठेवली आहे; परंतु तसा आदेश येण्याची शक्यता कमी आहे, असे राष्ट्रवादीचे नगरसेवक खासगीत बोलताना सांगतात. काँग्रेसने महापौर पदावर दावा ठोकला आहे; परंतु काँग्रेसचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे खरी चुरस सेना व राष्ट्रवादीतच आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसला झुकते माप आहे. परंतु, हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी बहुमताचा जादुई आकडा त्यांना गाठता येणार नाही. सेना व राष्ट्रवादीची फाटाफूट होईल, असे गृहीत धरून भाजपाच्या पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास कुणाला पाठिंबा द्यायचा, यासाठी भाजप नगरसेवकांच्या महिनाभरापासून बैठका सुरू आहेत. परंतु, सत्तेच्या बाजूने राहायचे की विरोधात बसायचे, या निर्णयापर्यंत भाजपचे नगरसेवक अजून तरी पोहोचलेले नाहीत. त्यांच्यात मतभेद आहेत. काहीजण निराेपाची वाट पाहून आहेत. बसपाचे ५ नगरसेवक आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते, असे बसपाच्या नगरसेवकांना वाटते.

....

भाजप- बसपात गुफ्तगू

सेना व राष्ट्रवादीला एकत्र आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, राज्यात महाविकास आघाडी असली तरी नगर शहरातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सेना व राष्ट्रवादीत टोकाचा संघर्ष आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात आहेत. म्हणूनच त्यांना महत्त्व आहे. एकत्र आल्यास दोघांनाही धोका आहे. त्यामुळे सेना व राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाहीत, असेच चित्र भाजप व बसपाकडून रंगविले जात आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आले नाही तर भाजप व बसपाचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्याही बैठका सुरू आहेत.

Web Title: The mayoral election is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.