कोणी लस देता का लस ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:18 AM2021-07-25T04:18:33+5:302021-07-25T04:18:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोणी लस देता का लस? अशी मोबाइलवरून विचारणा करणारे अनेक फोन माध्यमे, नगरसेवक, अधिकारी, ...

Does anyone get vaccinated? | कोणी लस देता का लस ?

कोणी लस देता का लस ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोणी लस देता का लस? अशी मोबाइलवरून विचारणा करणारे अनेक फोन माध्यमे, नगरसेवक, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे खणखणत आहेत. नगर शहरात आठ दिवसांपासून कोरोनावरील लस उपलब्ध होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर शहरात गुरुवारी सात दिवसांनंतर लस मिळाली. मात्र, रांगेत उभे राहिलेल्यांना, तसेच पहिल्यांदा लस घेणाऱ्यांना ती मिळालीच नाही. खासगी दवाखान्यात मात्र ७४० रुपये देऊन लस विकत मिळत आहे. मात्र, सामान्य नागरिकांना मोफत लस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांची लसीकरण केंद्रावर पायपीट सुरू असल्याचे दिसते.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनावरील लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. रोज जिल्ह्यासाठी केवळ ३ ते ४ हजार डोस दिले जात आहेत. लसींचे हे डोस अत्यंत कमी असून, संपूर्ण जिल्ह्यात लसींचा पुरवठा करायचा झाल्यास एकेका केंद्रावर १० ते २० एवढ्याच लोकांना लस देता येइल, अशी स्थिती आहे. नगर शहरात एका दिवशी किमान पाच हजार लोकांना लस घेता येईल एवढा लसींचा पुरवठा आवश्यक आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत १० टक्केही लस मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. गत आठवड्यात सलग आठही दिवस नगर शहरातील नागरिकांना लस मिळाली नाही. एका सामाजिक संस्थेने नगरमध्ये आंदोलनही केले. दुसऱ्या दिवशी केवळ एकेका केंद्रावर ५० लसींचे डोस होतील एवढाच पुरवठा झाला. त्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.

-----------------

असे झाले लसीकरण

वयोगट पहिला डोस घेतलेले दुसरा डोस घेतलेले एकूण

१८ ते ४५ १,८९,०४४ ११,३४५ २,००,३८९

४६ ते ५९ २,९०,३४३ ९७,३६३ ३,८७,७०६

६० पेक्षा जास्त २,८०,४०९ १,१९,६८६ ४,००,०९५

------------------------

खासगीत सुकाळ, सरकारी दवाखान्यात दुष्काळ

नगर शहरात महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध होत नाही. खासगी दवाखान्यांना थेट कंपनीकडूनच लस विकली जाते. त्यामुळे पैसे देऊन लस मिळते, तर सरकारी दवाखान्यांमध्ये लस उपलब्ध का होत नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सरकारी दवाखान्यात लस मिळत नसल्याने खासगी दवाखान्यात पैसे देऊन लस टोचून घेतली आहे. कोविशिल्ड लस दोन आठवड्यांपासून महापालिकेच्या केंद्रावर उपलब्ध झाली नाही. मात्र, हीच लस खासगी दवाखान्यांमध्ये पैसे देऊन उपलब्ध होत असल्याची स्थिती आहे.

------------------

नगर शहराला रोज किमान पाच हजार जणांना देता येईल ए‌वढी लस उपलब्ध झाली तरच दोन महिन्यांत संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होऊ

शकेल. त्यात पहिला, दुसरा डोसही पूर्ण होणे आवश्यक राहणार आहे. शासनाकडूनच आवश्यकतेएवढी लस उपलब्ध होत नसल्याने सध्या टंचाई आहे.

-डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका

-----------

हेच का मोफत लसीकरण

लसीकरण हा कोरोनाचा एकमेव उपलब्ध इलाज आहे. असे असताना लसीकरणात मात्र केवळ गोंधळ दिसून येत आहे. लोक रांगेत उभे असतात, लस मात्र केवळ वशिल्याच्या लोकांनाच दिली जाते. नगर शहराला जास्तीत जास्त लस उपलब्ध व्हावी यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

-सुहास मुळे, सामाजिक कार्यकर्ते

----------------

गेल्या आठ दिवसांपासून महापालिकेच्या अनेक केंद्रांवर गेलो. मात्र, मला लस मिळाली नाही. एक लस घेण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. त्यात दुसरा डोस दिला जात आहे. पहिला डोस मिळत नसल्याने लसीकरणामधून थोडीफार आरोग्यदृष्ट्या सुरक्षा मिळते, तेवढी सुरक्षा मिळविण्यात नागरिक वंचित राहत आहेत.

-संतोष ठोंबरे, नागरिक, नगर

Web Title: Does anyone get vaccinated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.