अहमदनगर : मार्चएण्डच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे वार्षिक लेखा परीक्षण नाशिक विभागीय कार्यालयाच्या पथकाकडून सुरू आहे. मात्र हे पथक एका हॉटेलमध्ये थांबल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची गर्दी या हॉटेलात होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत आता कोरोनाग्रस्तांची संख्या दहावर पोहोचली आहे.
कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असताना जिल्हा परिषदेच्या लेखा परीक्षणात कर्मचारी एकाच ठिकाणी गर्दी करत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिक विभागीय कार्यालयातून ऑडिटरची टीम नगरला आलेली असून जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात लेखा परीक्षणाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची गर्दी करण्यात येत आहे. यातून मुख्यालयात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याची शंका कर्मचाऱ्यांची उपस्थित केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोना हद्दपार झालेला होता. मात्र, पाच ते सहा दिवसांपासून मुख्यालयात लेखा परीक्षणाच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची गर्दी वाढली आहे. लेखा परीक्षण करताना अधिकाऱ्यांचे गमतीदार किस्से, तसेच त्यांची खास बडदास्त जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय ठरला आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत कोरोनाबाधित यांची संख्या पाच होती ती आता दहावर पोहोचली असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत.
...................
ऑडिटरचा मुक्काम हॉटेलमध्ये
नगरला जिल्हा परिषदेत लेखापरीक्षण करण्यासाठी आलेल्या नाशिकच्या ऑडिटरच्या पथकाचा मुक्काम जिल्हा परिषदेच्या जवळच एका हॉटेलमध्ये करण्यात आलेला आहे. शहरात शासकीय विश्रामगृह असताना ऑडिटर यांचा मुक्काम हॉटेलमध्ये कसा यावर कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना विचारले असता संबंधित ऑडिट पथकाची राहण्याची व्यवस्था करणे जिल्हा परिषदेवर बंधनकारक नाही. त्यांनी कुठे राहावे हा त्यांचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.