राहुरी: पुरेसा ऊस उपलब्ध असतानाही पहिल्यांदाच राहुरी येथील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा बंद राहणार आहे. अडचणीत सापडलेल्या संचालक मंडळाने ऊस उत्पादकाचे पेमेंट व कामगारांचे काही पगार देण्याबाबत सहमती दर्शवली आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून शेतकरी व कामगारांचे लक्ष संचालक मंडळाच्या निर्णयाकडे वेधले आहे.कारखान्याचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक नुकतीच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अतिथीगृहात झाली. यावेळी बुधवारपर्यंत पगार देण्यावर चर्चा झाली. बैठकीला उपाध्यक्ष सुरेश वाबळे, विरोधी संचालक शिवाजीराव गाडे, भगवान कोळसे, नितीन ढोकणे आदी उपस्थित होते. राजीनामा दिलेले संचालक अँड. सुभाष पाटील, शरद पेरणे व शैलजा धुमाळ यांनी बैठकीकडे पाठ फिरविली. साखर संचालकांचा बडगा व कारखान्याची बिकट अवस्था लक्षात घेता संचालक मंडळात अस्वस्थता कायम आहे. परकीय कर्ज मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कर्ज मिळविण्यात येणार्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आहे. कर्ज मिळविण्यासाठी संचालक मंडळाने सर्व अधिकार कारखान्याचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांना दिले आहेत.
५९ वर्षात पहिल्यांदाच बंदची नामुष्की
- मुळा धरणाच्या कृपेने मुबलक प्रमाणावर ऊस उपलब्ध असतानाही तनपुरे कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा कारखान्याचे गळीत बंद राहणार आहे. - कारखान्यात वारंवार झालेल्या सत्तांतरामुळे कुणी चुका केल्या हा भाग अलहिदा असला तरी एकेकाळी राज्यात दरारा असणारा कारखाना मात्र अडचणीत आला आहे. ५९ वर्षांत पहिल्यांदाच कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की संचालक मंडळावर आली आहे.
(तालुका प्रतिनिधी)