जामखेड : जमिनीची खरेदी खताप्रमाणे महसुली रेकॉर्डला नोंद लावून सुधारित सातबारा उतारा देण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना खर्डा येथील कामगार तलाठ्याला लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.याबाबत सूत्रांची माहिती अशी की, तक्रारदार दीपक अशोक चव्हाण याने खर्डा येथे २७ गुंठे जागा १३ आॅक्टोबर २०१४ रोजी खरेदी केली होती. खरेदी खताची नक्कल घेऊन त्यांनी खर्डा येथील कामगार तलाठी चंद्रकांत गजाबा बनसोडे (वय ४६) यांच्याकडे नोंद करण्यासाठी रितसर अर्ज केला. सदर जमिनीची नोंद करण्यासाठी कामगार तलाठी चंद्रकांत बनसोडे याने वीस हजाराची मागणी केली होती. परंतु तडजोडीनंतर रक्कम १२ हजार देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदार दीपक चव्हाण याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. तक्रारदार ठरलेल्या बारा हजारापैकी बुधवारी दोन हजाराची रक्कम देणार होता. तक्रारदार चव्हाण हा खर्डा येथील कामगार तलाठी बनसोडे यांना कार्यालयात ठरलेले दोन हजार देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस उपअधीक्षक देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय मुर्तडक, पो. हे. कॉ. वसंत वाव्हळ, पो.ना. रवींद्र पांडे, प्रमोद जरे, सुनील पवार, श्रीपादसिंह ठाकूर, दशरथ लाड यांनी सापळा रचून तलाठी चंद्रकांत बनसोडे यास ताब्यात घेतले. (तालुका प्रतिनिधी)
लाच घेताना कामगार तलाठ्यास पकडले
By admin | Updated: December 11, 2014 00:38 IST