लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ३० किलोमीटर आहे. त्यापैकी २. ५ किलोमीटर अंतर हे पुलांचे आहे. सध्या १८ किलोमीटरचे मातीचा भरावाचे काम सुरू आहे. ६.५ किलोमीटरचे सिमेंट काँक्रीटच्या एका थराचे काम झाले असून अंतिम थर बाकी आहे. तर ३ किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटच्या अंतिम थरासह काम पूर्ण झाले आहे.
या ३० किलोमीटरदरम्यान लहान – मोठे असे एकूण १३७ पूल आहेत. त्यापैकी सर्वांत मोठे दोन इंटरचेज आहेत. तसेच गोदावरी नदी, कोळ नदी, खडकी नदी, मनमाड – दौंड रेल्वेमार्ग, चांदेकसारे येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन, देर्डे- कोऱ्हाळे येथे दोन असे एकूण आठ मोठे उड्डाणपूल आहेत. तसेच दहा गावांतील महत्त्वाची रहदारी असलेल्या स्थानिक रस्त्यासाठी एकूण २७ लहान पूल आहेत. तर प्राण्यासाठी, पाट, चाऱ्या, शेतकऱ्यांसाठी, पाईपलाईनसाठी, १०० बोगदे असून सर्वाचे काम सुरू आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे, घारी, डाऊचबू, चांदेकसारे, जेऊरकुंभारी, कोकमठाण, संवत्सर, कान्हेगाव, भोजडे व धोत्रे या दहा गावांतून समृद्धी महामार्ग जातो.
जागतिक दर्जाचे देवस्थान असलेल्या शिर्डीसाठी नगर- मनमाड महामार्गावर कोकमठाण शिवारात तीनचारी येथे ३०० एकरमध्ये सर्वात मोठे इंटरचेंजेस असून त्याच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
धोत्रे येथे छोट्या स्वरूपात इंटरचेंज असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच याच गावात स्मार्टसिटी होणार आहे.
१ मे २०२१ पर्यंत नागपूर -शिर्डीदरम्यान महामार्ग सुरू करण्यासाठी धोत्रे येथील इंटरचेंज येथून वाहने खाली उतरून जुन्या मुंबई - नागपूर महामार्गाला जोडून शिर्डीकडे जाता येणार आहे. त्यासाठीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
.....................
फोटोओळी –
कोपरगाव तालुक्यात नगर – मनमाड महामार्गावरील कोकमठाण शिवारात तीनचारी येथे इंटरचेंजेसच्या सर्वात मोठ्या पुलाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.