याप्रकरणी महिला सरपंचांसह ग्रामस्थांनी राहुरी येथे तहसील कार्यालयात धाव घेतली. वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन शुक्रवारी (दि.२१) तहसीलदारांना दिले आहे. कोणाकडे तक्रार करायची करा, मला कोण आडवे येतो, ते बघून घेतो. जो आडवा येईल त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. घटनास्थळी राहुरी पोलिसांनी धाव घेत पाहणी केली.
वाळू तस्कराने वाळू उपशासाठी लागणारी वाहने नदीपात्रात जाण्यासाठी रस्ते तयार केले आहेत. ते रस्ते ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी खणून बुजून टाकले. मात्र, गुरुवारी रात्री वाळू तस्कराने हे रस्ते पुन्हा तयार करून खुलेआम वाळू उपसा सुरू केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊन वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर वाळू तस्कराने महिला सरपंचांसह सर्वांना शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, वाळू तस्कराच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात ग्रामस्थांचे सह्यानिशी निवेदन देण्यात आले असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.