------------
लोकमत न्यूज नेटवर्क
सुदाम देशमुख
अहमदनगर : कोरोनाच्या काळात जिल्हा पतंजली योग समितीने शहरी आणि ग्रामीण भागात ऑनलाइन योगाचे धडे दिले. त्यामध्ये पुरुषांपेक्षा महिलाच आघाडीवर होत्या. वर्षभर घेतलेल्या शिबिरांमध्ये चार हजार महिलांचा सहभाग होता. हे प्रमाण ८० टक्के होते. पुरुष पहिल्या दिवशी सहभागी होतात. मात्र, त्यानंतर त्यात सातत्य नसल्याचे दिसून आले. योगाचे धडे घेतलेल्या या महिलांनी कुटुंबांमध्येही योग, प्राणायामाबाबत जागृती केल्याचे दिसून आले.
जगाच्या पातळीवर २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांंमध्ये आरोग्य, व्यायामाबाबत जागृती घडावी, यासाठी योग दिनाचे महत्त्व आहे. कोरोनापूर्वी शाळा, महाविद्यालये, संस्था आणि सार्वजनिक ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन केले जायचे. कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून ऑनलाइन योगाचे वर्ग, शिबिर घेतले जातात. येथील जिल्हा पतंजली योग समितीने जिल्हाभरात ऑनलाइन योग शिबिरांचे आयोजन केले होते. त्यामध्ये पाच हजार जणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये चार हजार महिलांचा सहभाग होता, तर एक हजार पुरुषांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवसापासून ते शिबिराच्या शेवटच्या दिवसापर्यंत महिलाच योग शिबिरात सातत्य ठेवत असल्याचे दिसून आले, तसेच शिबिर संपल्यानंतर त्या आपल्या कुटुंबामध्येही जागृती करीत असल्याचे दिसून आले. दरम्यान, कोरोनाच्या काळात पतंजली समितीने एक हजारापेक्षा जास्त गुळवेलच्या काड्या घरोघरी वाटप केल्या. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लोकांनी नियमित योग, प्राणायाम करावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग आणि जिल्हा पतंजली योग समिती सातत्याने करीत आरोग्याबाबत जागृती करीत आहेत.
---------
जिल्हा पतंजली योग समितीने जिल्हभरात ऑनलाइन योगाचे धडे दिले. त्यामध्ये महिलांचा सहभाग ८० टक्के, तर पुरुषांचा सहभाग २० टक्के आढळून आला, याशिवाय महिलांमध्ये योग, प्राणायाम करण्यात सातत्य टिकून आहे, तसेच त्या समाजातही चांगल्या प्रकारे योगाची जागृती करीत आहेत. ग्रामीण भागातही अनेक शिबिरे घेतली. मात्र, ग्रामस्थांचा केवळ १२ टक्के सहभाग दिसून आला.
-प्रा.बाळासाहेब निमसे, प्रमुख, जिल्हा पतंजली योग समिती
---------------
पुरुषांना जीममध्ये जाऊन व्यायाम करता येतो. अनेक जण फिरण्यासाठी जातात. मात्र, घरात बसून योगाचे धडे घेण्याची मोठी संधी महिलांना मिळाली. त्यामुळे महिला वर्गाने घरात बसून योग, प्राणायामचे धडे घेतले. घरातली कामे पाहून व कुठेही न जाता, धावपळ न करता व सकाळच्या वेळी योग करणे महिलांसाठी पर्वणी ठरली. त्यामुळे ऑनलाइन वर्गांना पुरुषांपेक्षा महिलांचा प्रतिसाद मिळाला.
- कृष्ण पेण्डम, आर्ट ऑफ लिव्हिंग, नगर
-----------
फोटो-२०योगा
जिल्हा योग पतंजली समितीने नगरजवळील खंडोबाच्या डोंगरावरून ऑनलाइन योगाचे धडे देताना प्रा.बाळासाहेब निमसे, मधुकर निकम आदी प्रशिक्षक.