अहमदनगर : तालुक्यातील विळद येथे गुप्तधन मिळविण्यासाठी जादूटोणा करून वाड्याची खोदाई करणाऱ्या पाच जणांना एमआयडीसी पोलिसांनी वाड्यावर छापा टाकून अटक केली. त्यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे. नगर तालुक्यातील विळद येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जगताप व अडसुरे यांच्या एका पडक्या वाड्यात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास काही लोक पूजा करीत होते. भानामती, जादूटोणा अशा प्रकारची अघोरी पूजा तेथे सुरू होती. या वाड्यात काहीतरी हालचाली सुरू असल्याची माहिती काही लोकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना कळविली. त्यांनी गस्तीवरील पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी थेट वाड्यावर छापा टाकला. या कारवाईत चंद्रशेखर देवपेरुमल मुदलीयार (रा. विजय लाईन, भिंगार), संतोष साहेबराव शिंदे (रा. बुऱ्हाणनगर), निसार अन्सार शेख (रा. दरबार कॉलनी, मुकुंदनगर), रवी प्रभाकर क्षीरसागर (रा. पारीजात चौक, गुलमोहोर रोड), विठ्ठल खंडोजी चिकणे (रा. दर्गादायरा) या पाच जणांना अटक केली. यामध्ये चंद्रशेखर हा मांत्रिक होता. घटनास्थळावर नारळ, लिंबू, गोमूत्र, पाणी, तांदूळ साहित्य आढळून आले. मांत्रिकाद्वारे भानामती, जादूटोणा या प्रकारातील अघोरी पूजा करून वाड्यातील गुप्तधन शोधत असल्याची कबुली पाच जणांनी पोलिसांना दिली.
गुप्तधनासाठी जादूटोणा
By admin | Updated: June 2, 2016 00:59 IST