लोकमत संवाद
पारनेर : कोरोनामुळे राज्यातील दूध व्यवसाय संकटात सापडला असल्याने शेतकरी अडचणीत आहे. या दूध धंद्याला बळकटी देण्यासाठी राज्य सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार आहे, अशी माहिती राज्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धन व क्रीडा युवक मंत्री सुनील केदार यांनी लोकमतला सांगितले.
पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता मंत्री केदार यांनी लोकमतशी संवाद साधला. राज्यात पशुखाद्य दर वाढले असून, कोरोनामुळे दुग्ध व्यवसाय संकटात आल्याबाबत बोलताना ते म्हणाले, दुधाचा व्यवसाय हा मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून आहे. त्यामुळे दूध भुकटी करून किंवा अन्य प्रक्रिया करून हा व्यवसाय चालवावा लागतो. मागील वर्षी महाविकास आघाडी सरकारने दूध धंदा वाचविण्यासाठी अतिरिक्त दूध घेऊन ४०० कोटी रुपयांचे अनुदान दूध पावडर करण्यासाठी दिले होते. सध्याची परिस्थितीसुद्धा गंभीर असून आपण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या बाबतीत निर्णय घेणार आहोत. निघोजची ६० म्हशींचा सांभाळ करणारी श्रद्धा ढवण ही युवकांसाठी आयडॉल आहे. दुग्ध व्यवसाय बळीकटीकरणातील पहिले पाऊल म्हणून निघोज येथे लवकरच फिरता पशुवैद्यकीय दवाखाना करण्यात येणार आहे, असे केदार यांनी सांगितले.
..........
युवकांना स्वयंरोजगारासाठी चालना देणार
निघोजच्या श्रद्धा ढवणने दुग्धव्यवसाय उभारून युवकांना स्वयंरोजगारचा संदेश दिला आहे. राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने युवकांना स्वयंरोजगारासाठी चालना देण्यात येणार आहे. दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी एका योजनेवर काम असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले.