अहमदनगर: माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक संदीप कोतकर यांच्या अपात्रतेचा विषय प्रशासनाकडून महासभेसमोर गेला आहे. विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने दोन विधीतज्ज्ञांचे मत मागविले असून त्यासह प्रस्ताव महासभेसमोर पोहचला आहे. महासभा संदीप कोतकर यांच्याबाबतीत काय निर्णय घेणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे. संदीप कोतकर हे कॉँग्रेसचे नगरसेवक असून माजी महापौर आहेत. खून प्रकरणात त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांच्या अपात्रतेबाबत काय निर्णय घेतला अशी विचारणा विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांनी प्रशासनाकडे दोनदा केली. त्यानुसार नगरसचिव कार्यालयाने विधीतज्ज्ञांचे मत घ्यावे असा अभिप्राय आयुक्तांना दिला. त्यानुसार आयुक्तांनी विधीज्ञ प्रसन्ना जोशी आणि अनिता दिघे यांचे मत घेतले. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम १०,११,१२,१३, तसेच कलम ४०५ मधील तरतुदींचा अभ्यास करून अभिप्राय दिला आहे. महापालिकेने विनंती केल्यास हा विषय आयुक्त न्यायाधीशांकडे पाठवतील. न्यायाधीश निर्णय देत नाही तोपर्यंत तो सदस्य अनर्ह झाला असे मानले जाणार नाही, अशी तरतूद कायद्यात आहे. कलम १३ नुसार गैरवर्तणुकीबद्दल किंवा अशोभनीय गोष्टी बद्दल दोषी ठरलेल्या सदस्यास राज्य शासनाचे स्वत:हून किंवा महापालिकेचे शिफारशीवरून त्या व्यक्तीला सदस्यपदावरून दूर करता येते असा अभिप्राय अॅड. दिघे, जोशी यांनी दिला आहे. संदीप कोतकर यांचे मुंबई खंडपीठात त्यांचे अपील प्रलंबित आहे. नगरसेवक अपात्रतेचा विषय असल्याने निकालपत्राचे अवलोकन केले असता त्यात नगरसेवक पद अपात्रतेचा उल्लेख कोठेही नाही, असा अभिप्राय वकिलांनी दिला आहे. त्यामुळे महासभेच्या निर्णयाकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.
संदीप कोतकर अपात्र ठरणार ?
By admin | Updated: June 7, 2016 23:34 IST