अहमदनगर : नगर तालुक्यात महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची मोठी फळी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सत्यभाबाई भगवान बेरड यांना अवघी पंधरा मते मिळाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचा हा सर्वांत मोठा पराभव असून, यावरून आता महाविकास आघाडीत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
जिल्हा बँकेच्या १७ जागा बिनविरोध झाल्या. चार जागांसाठी निवडणूक झाली. नगर तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात भाजपविरुद्ध महाविकास आघाडी, असा सामना होता. ही निवडणूक कर्डिले यांनी एकत जिंकली. महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला. हा पराभव महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्याने घेतला आहे. तालुक्यात सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी ताकत आहे. तालुक्यातील नेते संपत म्हस्के, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, सेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, प्रवीण कोकाटे, गोविंद मोकाटे, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर ही तालुक्यातील दिग्गज नेते मंडळी महाविकास आघाडीसोबत होती. या सर्व नेत्यांना एकटे कर्डिले भारी पडले. त्यांनी १०९ पैकी ९४ मते घेतली. त्यामुळे हे अपयश कुणाचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नगर हा तालुका राष्ट्रवादीचे राज्यमंत्री पजाक्त तनपुरे यांच्या राहुरी मतदारसंघात येतो. विधानसभा निवडणूकीत तनपुरे व कर्डिले यांच्यात लढत झाली. विधानसभेनंतर झालेली ही सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक होती. या निवडणूकीत तनपुरे यांचा करिष्मा चालला नाही. याशिवाय राष्ट्रवादीचे दुसरी आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात नगर तालुका येतो. राष्ट्रवादीचे मंत्री तनपुरे व आमदार नीलेश लंके यांच्याच मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सेना व काँग्रेसचे दिग्गज नेते मंडळी, त्यांच्यासोबतीला असेलेले मंत्री व आमदार या सर्व नेत्यांची ताकत १५ मतांचीच आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
.....
तालुक्यातील निकालाची जिल्ह्यात चर्चा
जिल्हा बँकेचे १७ संचालक बिनविरोध निवडून आले. चार जागांसाठी निवडणूक झाली. बिगर शेती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड हे विजयी झाले. पारनेर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातूनही राष्ट्रवादीचे उदय शेळके विजय झाले. कर्जतमध्ये चुरशीची लढत झाली. काँग्रेसच्या उमेदवाराचा एक मताने पराभव झाला. नगर तालुक्यात मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवार बेरड यांना १५च मते मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, या निकालाची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.