अहमदनगर : नगर शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्याबाबत पुनर्विचार करून वेळेचे बंधन पाळून बाजारपेठ सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र शहरातील व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बुधवारी पाठविले.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, लॉकडाऊनचा कालावधी संपला आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. असे असताना कठोर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, मुंबई या शहरांची नगरशी तुलना केली जात असून, आकडेवारीनुसार लाॅकडाऊन वाढवून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे नगर शहरातील बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. कारण रोजीरोटीपुरते देखील कमवायची सोय राहिलेली नाही. तसेच दुकानांमध्ये पाऊस, उंदीर, धुळीमुळे, शॉर्टसर्किटमुळे काही दुर्घटना किंवा नुकसान होते आहे का? हे पाहण्यासाठी दुकान उघडले तरी व्यापाऱ्यांना दंड केला जात आहे.
कोरोनाच्या महामारीत उद्योगधंदे, पैसापाणी याला दुय्यम स्थान आहे. त्यासाठी शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन व्यापारी करतील. आम्हा व्यापाऱ्यांना देखील पोट आहे, कुटुंब आहे, मुलंबाळं आहेत. त्यांची व आमच्या आरोग्याची काळजी देखील आहे. म्हणून सगळे नियम बाजूला ठेवून आम्हाला परवानगी द्यावी, असे आमचे मुळीच म्हणणे नाही. परंतु, वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. मागील एका आठवड्यापासून नगरमध्ये रुग्णसंखेत घट होत असून, दररोज ५० ते ८० रुग्ण आढळून येत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. ऑक्सिजन बेडची टक्केवारी उपलब्धता ठरवताना इतर मोठ्या शहरांशी नगरची तुलना होऊ शकत नाही. याशिवाय २० ते २५ टक्के नागरिकांचे लसीकरणही झाले आहे.
वस्तुस्थिती लक्षात घेऊन व्यापाऱ्यांना योग्य तो कालावधीचा निकष लावून नियमांचे काटेकोरपणे पालन करून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर अभय कोठारी, लाभेष मुथा, स्वप्निल डुंगरवाल, प्रबल पटवा, वर्धमान मुथा, नीलेश संचेती, नीलेश पोखरणा, सचिन चोपडा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
..