लोकमत न्यूज नेटवर्क
आश्वी : संगमनेर तालुक्यातील २६ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. या मतदारसंघातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. १५) शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. थोरात व विखे या दोन्ही गटांचे गावपातळीवरील नेते, कार्यकर्ते यांनी आपापले विजयाचे दावे केले आहेत. सोमवारी (दि. १८) मतमोजणीनंतर ग्रामस्थांनी कुणाला कौल दिला. याबाबत चित्र स्पष्ट होईल.
कनोली, प्रिपीं लौकी आजमपूर, चिंचपूर खुर्द, चणेगाव, झरेकाठी, पानोडी, प्रतापपूर, शेडगाव, ओझर बुद्रूक, औरंगपूर, खळी, दाढ खुर्द, शिबलापूर व मनोली या संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाला जोडल्या गेलेल्या गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. प्रतापपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विखे गटाचेच तीन पॅनल असून, येथे विखेंच्या कार्यकर्त्यांमध्येच लढत झाली.
खळी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक गावच्या विकासासाठी बिनविरोध होण्याकरिता ग्रामस्थांनी प्रयत्न केले. येथील ९ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या. येथे थोरात व विखे या दोन्ही गटांचे कार्यकर्ते ग्रामविकास पॅनलखाली एकत्र आलेले पाहायला मिळाले. प्रचाराच्या एकाच फ्लेक्सवर एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांचे फोटो शेजारीशेजारी होते. हा विषय तालुक्यात सर्वत्र चर्चेला होता.
..............
दोन्ही गटांत चुरस
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील १२ गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे या दोन गटांत चुरस पाहायला मिळाली. १४ गावांतील २८१ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. या गावांमधील मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या पाहायला मिळाल्या.
...........
१२ गावांतील मतदानाची टक्केवारी
कनोली : ८५ टक्के , प्रिपीं लौकी आजमपूर : ८४.२० टक्के, चिंचपूर खुर्द : ९०.८९ टक्के, चणेगाव : ७८.६८ टक्के, झरेकाठी : ८०.२० टक्के, पानोडी ८२.३८ टक्के, प्रतापपूर ८८.७१ टक्के, शेडगाव ८७.७३, ओझर बुद्रूक ९४.४१ टक्के, औरंगपूर ९३.३६ टक्के, खळी ६० टक्के, दाढ खुर्द ९० टक्के, शिबलापूर ८१.७१ टक्के व मनोली ८९ टक्के इतके मतदान झाले.