विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक येथून नगर येथे येताना अनेक मंगल कार्यालये, हॉटेल, बाजारपेठ, रस्त्यांवर पाहणी केली. नागरिक मास्क घालून आहेत, असे चित्र त्यांना कुठेच दिसले नाही. एका मॉलमध्ये, दुकानातही त्यांनी सहजपणे नजर टाकली असता त्यांना दुकानदार आणि ग्राहक यापैकी कोणालाही मास्क लावलेले दिसले नाहीत. वाहनांवर येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या तोंडालाही मास्क दिसले नाहीत. एका मंगल कार्यालयात त्यांनी सहजपणे राऊंड मारला तर तिथेही कोणीाच मास्क असलेले दिसले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत रुद्रावतार घेतला. सगळे अधिकारी गमे यांचे मान खाली घालून निमूटपणे ऐकत होते. विभागीय आयुक्तांचे खडे बोल ऐकून पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील अधिकाऱ्यांची तर चांगलीच पाचावर धारण बसली. मास्क नसलेले नागरिक दिसत असताना पोलिस दलही काय करत आहे? असा खडा सवालही त्यांनी केला. त्यामुळे सारेच अधिकारी शांत झाले होते. बैठक संपल्यानंतर गमे यांच्या रुद्रावताराची महसूल आणि आरोग्य यंत्रणेत चर्चा होती. दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात फेरफटका मारला असता सर्वांच्याच तोंडी गमे यांनी घेतलेल्या झाडाझडतीची चर्चा होती. या बैठकीची खमंग चर्चा रंगवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्कही घातलेले नव्हते. मात्र आम्ही चहा पिण्यासाठी काढले आहेत, असे सांगून त्यांनी वेळ निभावली.
कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST