जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे या आठवड्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य व फक्राबाद सरपंच विश्वनाथ राऊत म्हणाले, फक्राबाद व पंचक्रोशीत गावांना आरोग्याचा लाभ व्हावा म्हणून तत्कालीन आमदार, माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडे दहा वर्षांपासून पाठपुरावा केला होता. परंतु त्यांनी फक्त लोकांना नादी लावले. पण काम नाही केले. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणुकीत आ. रोहित पवार यांना साकडे घातले. त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दोन मजली नवीन मॉडेलचे आरोग्य उपकेंद्र मंजूर करून मतांची भरपाई केली. फक्राबाद सरपंच विश्वनाथ राऊत यांच्या नादी लावण्याबाबतच्या बोलण्याचा धागा पकडून आ. रोहित पवार म्हणाले, पवारांची खासीयतच आहे. ते नादी लावत नाहीत तर कामे करतात. म्हणूनच जनता पाठीशी राहते. आ. रोहित पवार यांच्या या वाक्यावर उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र ‘नादी लावण्याची’ ही चर्चा कार्यक्रमानंतर सोशल झाली. त्यातील एक कार्यकर्ता दुसऱ्याला म्हणाला, मी तुझ्या नादाला लागलो म्हणूनच कार्यक्रमाला आलो. आता घरी जातो. नाही तर माझे धंदापाणीही नादाला लागायचे. यावर पहिल्याने टाळी देताच दुसरा खळखळून हसला.
कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:22 IST