अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बाजार समित्यांसह इतर जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले. आता आठवडे बाजार कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील बहुतांश भागातील आठवडे बाजार बंद झाले. एप्रिल, मे, जून असे जवळपास तीन महिने आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकविलेली तरकारी म्हणजेच भाजीपाल्याची काेठे विक्री करायची, याचा प्रश्न होता. अनेक शेतकऱ्यांनी गावोगावी वाडीवस्त्यांवर, शहरात गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विक्री केली. अनेकांना वाहतूक परवडत नसल्याने त्यांनी बांधावरच भाजीपाला फेकून दिला. काहींनी थेट पिकावरच नांगर फिरविला. काहींनी उभ्या पिकात जनावरे घातली. त्यामुळे या तीन महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
कोरोनाची लाट ओसरल्याने इतर जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. त्यात बाजार समित्याही सुरू झाल्या. आता आठवडे बाजारही सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
---
रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला विक्री..
आठवडे बाजार बंद असल्याने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शेतकरी शहरासह गावागावात मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा बसून भाजीपाला विक्री करीत आहेत. मात्र, येथे आठवडे बाजारसारखी पुरेशी जागा नसल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांचीही कसरत होते. अनेक ठिकाणी अपुऱ्या जागेमुळे गर्दीही होते. त्यामुळे पुन्हा कोरोना फैलावण्याचीही भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे.
---
शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प..
शेतीवर अवलंबून असलेले अनेक शेतकरी इतर पिकांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी भाजीपाला पिके घेतात. ही पिके कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळवून देतात. भाजीपाल्याची काही पिके तर अगदी एक ते दीड महिन्यात पैसे मिळवून देतात. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अशा भाजीपाला पिकांवर अवलंबून असतो. आठवडे बाजार बंद असल्याने अशा शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
-----
आम्ही वांगी, कारली, दोडके, टोमॅटो अशी तरकारी पिके घेतो. मात्र, दोन वर्षांपासून हमखास उत्पन्न मिळवून देणारी ही पिके तोट्याची ठरू लागली आहेत. यावर केलेला खर्चही निघत नाही. यासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक फवारणीसह वाहतूक खर्चही करावा लागतो. हा खर्च टाळण्यासाठी आठवडे बाजारात तरकारी विक्रीला आम्ही प्राधान्य देतो. मात्र, आठवडे बाजार बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-मच्छिंद्र शिंदे,
शेतकरी, श्रीगोंदा