श्रीरामपूर : दौंड - मनमाड या रेल्वे मार्गावरील सर्वच पॅसेंजर बंद करण्यात आल्या आहेत. त्याऐवजी एक्स्प्रेस चालविण्याकडे प्रशासनाचा कल दिसून येत आहे; मात्र त्यामुळे छोटी रेल्वेस्थानके ओस पडली आहेत. श्रीरामपूरजवळील निपाणी वडगाव रेल्वे स्थानक तर पाडून टाकण्यात आले असून, नागरिकांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीच्या पॅसेंजर कोविडनंतर सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यास आता दोन वर्षे होत आली आहेत. पुणे निजामाबाद, दौंड मनमाड व पुणे-नांदेड या पॅसेंजरचा त्यात समावेश आहे. याशिवाय शिर्डी फास्ट पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने आता पॅसेंजरऐवजी दौंड -भुसावळ नव्याने सुरू केली आहे.
पॅसेंजर नसल्यामुळे केवळ आरक्षित तिकिटावर एक्स्प्रेसतून प्रवास करावा लागत आहे. जिल्ह्यात केवळ नगर, श्रीरामपूर व कोपरगाव या मोजक्याच स्थानकावर थांबा देण्यात आलेला आहे. त्यामुळे इतर छोटी स्थानके बंद पडली आहेत. तिथे आता कोणीही प्रवासी फिरकत नाही. एवढेच नाही तर श्रीगोंदा व राहुरी या तालुक्याच्या रेल्वे स्थानकावरही थांबा नाही. त्यांच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे.
नगर जिल्ह्यामध्ये अकोळनेर, सारोळा, बांबोरी, विळद, पढेगाव, निपाणी वडगाव अशी काही छोटी स्थानके पॅसेंजर गाड्यांच्या प्रतीक्षेत आहेत. श्रीरामपूर नजीकचे अतिशय जुने निपाणी वडगाव स्थानकाची इमारत पाडण्यात आली आहे. येथून रेल्वेचे तिकीटही आता मिळत नाही. काही स्थानिक नागरिकांनी एकच व्यक्ती प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रारही केली होती; मात्र रेल्वे मार्गाच्या दुहेरी कारणामुळे हे स्थानक पाडण्यात आल्याचे नागरिकांना सांगण्यात आले; मात्र त्यावर अजूनही त्यांचे समाधान झालेले नाही. इतर स्थानकांवरही अशीच कुऱ्हाड कोसळणार का, अशी भीती प्रवाशांमधून व्यक्त केली जात आहे.
..................
बंद पॅसेंजर - पुणे- निजामाबाद, दौंड -मनमाड, पुणे -नांदेड, शिर्डी फास्ट पॅसेंजर.
-----
निपाणी वडगाव स्थानकाची इमारत पाडून टाकण्यात आली आहे. अशोक नगर, कारेगाव, मातापूर, खोकर, वळदगाव येथील विद्यार्थी– नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूर स्थानकाचे प्रबंधक एल.पी. सिंग यांच्या मार्फत विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर यांच्याकडे तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे. स्थानकाची नवीन इमारत बांधणे, पॅसेंजर पूर्ववत करणे या प्रमुख मागण्या आहेत.
श्रीकृष्ण बडाख, सामाजिक कार्यकर्ते, अशोक नगर.
----
फोटो ओळी : ०१निपाणी
स्थानक निपाणी वडगाव स्थानकाची इमारत पडल्यानंतरचे तेथील चित्र. स्टार १११४