तिसगाव : शासन पातळीवरून दिली जाणारी दुधाचे वाढीव अनुदान देण्याची पहिल्या टप्प्यातील मुदत आक्टोबर अखेर संपली. आता पुन्हा दर कोसळण्याची संभ्रमित अवस्था तिसगाव परीसरात झाली. यामुळे पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील युवा दुध उत्पादक बाबासाहेब बुधवंत यांनी याबाबतचा संताप थेट दुग्धविकासमंत्री यांच्याकडेच भ्रमणध्वनीवरून व्यक्त केला.मंत्री फोन उचलतील की नाही. फोन करावा की नाही. या दुहेरी मनस्थितीत मोबाईलवर नंबर डायल केला. रिंग वाजताच फोन उचलला गेला. सामान्य दुध उत्पादक व ओळख सांगताच तेवढ्याच आदराने मंत्री महादेव जानकर म्हणाले, ३१ आक्टोबर पर्यंतच्या पहील्या टप्प्यातील वाढीव अनुदान देण्याची मुदत संपली आहे. दुधाचे अनुदान बंद केलेले नाही. केवळ पुढील शासकीय अध्यादेश काढला गेला नाही. येत्या सप्ताहात तसा अध्यादेश जारी करू. असा निर्वाळा दिला.याबाबत लोकमतशी बोलताना बुधवंत म्हणाले, मंत्री फोन उचलून सामान्यांचे प्रश्नाला समर्पक उत्तर देतात. ह्याची प्रचीती आली. लवकर अध्यादेश निघून दुध उत्पादकांना दिलासा मिळणे कामीची प्रक्रिया पुर्णत्वास जावी. दरम्यान मंत्री जानकर व बुधवंत यांच्या संभाषणाची आॅडीओ क्लिप तिसगाव परीसरात सोशल मिडीयावरही व्हायरल झाली आहे.
थेट मंत्री फोन उचलतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 17:08 IST