अहमदनगर: एक एकर शेती खरेदी करण्यापासून ते त्यावर बांधकाम करून घरे विकेपर्यंत बिल्डर साधारणत: ५० लाख रुपयांवर पैसे महापालिकेला देत असतो. त्यातून महापालिकेने नव्याने उभारलेल्या कॉलनीत सुविधा दिल्या पाहिजेत. मात्र, लोकांची दिशाभूल करून नेतेमंडळी बिल्डरवर खापर फोडत आहेत. ते चुकीचे असून नेत्यांनी महापालिकेचा हिशेब तपासावा, असा सूर बिल्डर संघटनेतून बुधवारी उमटला. बोल्हेगाव, नंदनवननगर, पोलीस कॉलनीच्या निमित्ताने हा प्रश्न समोर आला आहे. या भागातील नागरिकांना बिल्डरने पिण्याच्या पाण्याची लाईन टाकून दिली नाही. त्यामुळे दहा वर्षांपासून नागरिक पाण्यासाठी भटकंती करत असल्याचा आरोप मंगळवारी सभागृह नेते कुमार वाकळे यांनी केला होता. त्यानंतर बिल्डर संघटनेत त्यावर नाराजीचा सूर उमटला. शेती खरेदी केल्यानंतर ती एन.ए. करीता महापालिका रस्ता, ड्रेनेज व पाण्याची लाईन टाकण्यासाठी बिल्डरकडून पैसे घेते. खरेदी करतेवेळी महसूलकडून १ टक्का एलबीटी महापालिकेला मिळते. याशिवाय एक टक्का हस्तांतरण फी महापालिकेत भरावी लागते. बिल्डींग प्लॅन मंजूर करतानाही विकासभार व उपकराचे पैसे बिल्डरकडून महापालिका आकारते. ग्राहकाला खरेदी देताना त्या खरेदीतील एक टक्का एलबीटी महसूलमार्फत पुन्हा महापालिकेला मिळते. याशिवाय हस्तांतरण फीचे पुन्हा एक टक्का महापालिकेच्या तिजोरीत जाते. हा सगळा हिशेब केला तर बिल्डर एकरी जवळपास ५० लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत भरतो. पाणी लाईन, ड्रेनेजचे पैसे बिल्डरकडून आकारूनही महापालिका त्या सुविधा नव्याने उभारलेल्या कॉलनीत देत नाहीत. त्यामुळे बिल्डरने भरलेला हा पैसा नेमका जातो कोठे? याचा हिशेब नेत्यांनी महापालिका दप्तरी तपासला पाहिजे. बिल्डरच्या नावे खापर फोडू नका, अशी मागणी बिल्डर संघटनेतून पुढे आली आहे. (प्रतिनिधी) बिल्डर महापालिकेकडे लाखो रुपये कर रुपाने भरत असतो. त्यातून महापालिकेने रस्ते,ड्रेनेज, पाणी लाईन सुविधा पुरविल्या पाहिजेत. पण तसे होत नाही. नागरिक सुविधेसाठी महापालिकेत गेले तर महापालिकेचे अधिकारी बिल्डरकडे बोट दाखवितात. महापालिकेने बिल्डरकडून एन.ए. करताना कर आकारणी करण्याऐवजी कॉलनी विकासित करून घ्यावी. - श्रनिवास कनोरे, बिल्डर. गजानन कॉलनीचे रोल मॉडेल लेखानगरशेजारील गजानन कॉलनी उभारताना तत्कालीन आयुक्त कल्याण केळकर यांनी बिल्डरकडून ले-आऊंट मंजूर करताना कोणतेच पैसे घेतले नाहीत. त्या पैशातून रस्ता, ड्रेनेज व पाण्याची लाईन टाकून घेतली. बिल्डर श्रीनिवास कनोरे यांनी कॉँक्रिट रस्ता तसेच पिण्याच्या पाण्याची लाईन व खुल्या भूखंडावर बगीचाही उभारून दिला. आज या कॉलनीत लोक पायाभूत सुविधेसाठी कधीच महापालिकेत आले नाहीत. विशेष परवानगी देत केळकर यांनी बिल्डर कनोरे यांच्याकडूनच कॉलनीतील रहिवाशांना सुविधा दिल्या. त्याच धर्तीवर महापालिकेने बिल्डरकडून नव्याने उभारत असलेल्या कॉलनीचा विकास करून घ्यावा. त्याला बिल्डर संघटनाही तयार आहे.
बिल्डरच्या पैशाचा हिशेब काय?
By admin | Updated: May 6, 2016 18:41 IST