कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्याचबरोबर विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, याबाबत वेळोवेळी आदेश निर्गमित केले आहेत. मात्र काही लोकांना कोरोनाचे गांभीर्य अजून सुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे नगर तालुक्यात ग्रामीण भागात अशा विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करून त्यांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. अनुषंगाने नगर तालुक्याच्या अखत्यारीतील एमआयडीसी, भिंगार आणि नगर ग्रामीण या तिन्ही पोलीस स्टेशनना आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.
यामुळे विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांची सक्तीने चाचणी करण्यात येत आहे. नगर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अरणगाव येथे वाळकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ससाणे यांच्या टीमने चाचणी करून पॉझिटिव्ह येणाऱ्या पेशंटना सक्तीने अरणगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्याचप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत अशा प्रकारच्या चाचण्या करून निंबळक येथील कोविड केअर सेंटरमध्ये सक्तीने रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. अशाचप्रकारे भिंगार पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात नागरदेवळे आणि भिंगार बाजारतळ या भागात कारवाई सुरू आहे.