कोपरगाव : शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन हे रुग्ण संख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. परिणामी रुग्ण मृत्यूदर वाढला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील स्थानिक नागरिक, व्यापारी व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे मागणीनुसार ३० एप्रिल रात्रीपासून ८ मे रोजी सकाळपर्यंत आठवडाभराचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.
यादरम्यान फक्त शहरातील दवाखाने, मेडिकल २४ तास सुरु राहणार आहे, सकाळी ७ ते ११ या वेळेत पाणी जार व दूध विक्री सुरु राहणार आहे. तसेच भाजीपाला, फळे, किराणा व इतर सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे कोपरगाव नगरपरिषद कोरोना नियंत्रण समितीच्या वतीने सांगण्यात आले.