चौंडी : राज्यातील धनगर समाज गत ६५ वर्षे आपल्या मागणीच्या प्रतीक्षेत आहे. आमच्या सत्ताकाळात या समाजाला न्याय देऊ. न्याय न मिळाल्यास आम्हीही गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी चौंडी येथे केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९१ व्या जयंती उत्सवात त्या बोलत होत्या. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते़ यावेळी राजस्थानचे उद्योगमंत्री गजेंद्र सिंह, माजी मंत्री अण्णा डांगे, सोहळ्याचे स्वागताध्यक्ष गृहराज्यमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. गत वीस वर्षे ‘रासप’चे नेते महादेव जानकर चौंडीत जयंती उत्सवाचे आयोजन करत होते. मात्र, यावर्षी त्यांनी चौंडीऐवजी मुंबईत मेळावा घेतल्याने चौंडीच्या सोहळ्याकडे राज्याचे लक्ष होते. राम शिंदे यांनी हा समारंभ आयोजित करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दहा आमदारांची उपस्थिती राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे समारंभाला येणार होत्या. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. गणपतराव देशमुख, अनिल गोटे, रामराव वडकुते, नारायण पाटील, रामहरी रुपनवर, दत्तात्रय भरणे, भीमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे आदी दहा आमदारांची समारंभाला उपस्थिती होती. सर्वच आमदारांनी भाषणात धनगर आरक्षणाची मागणी केली. अहिल्यादेवींची जयंती चौंडीतच साजरी व्हावी तसेच शिंदे यांनी समाजाचे नेतृत्व करावे ही मागणीही बहुतेकांनी केली. अहिल्यादेवी स्मारकावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली गेली.चौंडीची सेवा करा, तुमची उंची वाढेल : राम शिंदेअहिल्यादेवी होळकरांचा जन्म चौंडी येथे झाला.त्यामुळे हे ठिकाण प्रेरणास्थान व तीर्थक्षेत्र आहे. चौंडीची उंची वाढली तर आपोआप तुमचीही उंची वाढेल. मला चौंडीमुळेच भरभरुन मिळाले. त्यामुळे कदापिही हे प्रेरणास्थान सोडणार नाही व समाजाचा उपयोग स्वार्थासाठी करणार नाही, अशा शब्दात गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी महादेव जानकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. राम शिंदे मुख्य आकर्षणचौंडी (ता़ जामखेड) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवात शिंदे आज मुख्य आयोजकाच्या भूमिकेत होते. ‘रासप’नेते महादेव जानकर हे यापूर्वीच्या जयंती सोहळ्याचे आकर्षण असायचे, मात्र आज ती जागा शिंदे यांनी घेतली. व्यासपीठासह परिसरातील सर्व बॅनर्सवर त्यांचीच छबी होती. जानकर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय होता. त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी वरील विधाने केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री मनोहर जोशी व गोपीनाथ मुंडे चौंडीला आले तेव्हापासून चौंडीचा कायापालट झाला़ येथील विकासासाठी पर्यटन विकासातून ९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे़ मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक घेऊन अहिल्यादेवींची शासकीय जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला़ सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव देण्यात येणार आहे़ तसेच डॉ़ विकास महात्मे यांच्या माध्यमातून धनगर समाजाला प्रथमच संसदेत संधी देण्यात आली आहे़ भाजपाच्या सत्ताकाळात प्रथमच धनगर समाजाच्या बहुतांशी प्रलंबित मागण्या मार्गी लागल्या आहेत़ आरक्षणाच्या विषयाबाबतही गांभीर्याने काम सुरू आहे़
आमच्या सत्ताकाळात धनगर समाजाला न्याय देणार
By admin | Updated: May 31, 2016 23:04 IST