तिसगाव : मागील दहा दिवसांपूर्वी प्रादेशिक नळ योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर तो पूर्ववत सुरू झाल्यानंतर तिसगाव ग्रामपंचायतीकडे महावितरणचे वीज बिल थकल्याने त्यांनीही पाणी पुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे तिसगावकरांना अशा अनेक तांत्रिक कारणांना सामोरे जावे लागत असून ऐन सणासुदीच्या काळात पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे.
या निष्काळजीपणा विरोधात ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे, शिवसेना शहराध्यक्ष शरद शेंदूरकर यांच्यासह अनेक युवा तरुणांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला आहे. या पाणी टंचाईबाबत सदस्य लोखंडे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून तिसगावकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असून मागील काही दिवस मिरी तिसगाव योजनेचा वीज पुरवठा बंद केल्यामुळे ही योजना काही दिवस बंद होती. दोन-तीन दिवसांपासून योजनेचे पाणी सुरू झाले. परंतु, ग्रामपंचायतीच्या वीज बिलाच्या थकबाकीमुळे स्थानिक उपअभियंता यांनी वीज कनेक्शन कट केले. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या स्टोरेज टँकमधून पाण्याच्या टाक्या भरण्याचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद होता. त्यामुळे सणासुदीच्या काळात पाणी असूनही सर्वसामान्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी असूनही सर्वसामान्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली असल्याने पाणी उशाला आणि कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ पुन्हा एकदा तिसगावकरावर आली आहे.
कनेक्शन कट करण्यात येऊ नये, अन्यथा वीज महामंडळाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा नंदकुमार लोखंडे, शिवसेना शहरप्रमुख शरद शेंदुरकर, प्रसाद देशमुख, दादा पाठक, उदय लवांडे, किरण गारुडकर, कल्याण लवांडे, आजिनाथ लोखंडे यांनी दिला आहे.