अहमदनगर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी नगर तालुका त्यास अपवाद आहे. तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून सरासरी पावसाच्या सरकारी आकडेवारीच्या आधारे शासनाने सुरू असलेले टँकर बंद करून लोकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. मांडवा (ता. नगर) येथे पावसाअभावी विहिरी, तलाव कोरडे असल्याने ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी नगर तालुक्यातील काही गावे पावसाळा संपत आला, पण कोरडीच आहेत. असे असले तरी शासनाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचा साक्षात्कार झाल्यागत टंचाईग्रस्त गावांचे टँकर बंद करून टाकले. चिचोंडी पाटील गटातील मांडवा परिसरात पावसाने पाठ दाखवल्याने तेथील विहिरी, तलाव कोरडेठाक आहेत. प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत उपलब्ध आहेत की नाही याची कोणतीही शहानिशा न करता सरसकट टँकर बंद केल्याने गावाला सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. परिसरातही कुठे मुबलक पाणीसाठा नसल्याने विकतही पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुन्हा टँकर सुरू करण्याची जोरदार मागणी होत आहे. ग्रामपंचायतने टँकर सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. मात्र निवडणुकांच्या कामकाजात कर्मचारी व्यस्त असल्याने तो केव्हा मंजूर होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
मांडव्यात विकतही मिळेना पाणी
By admin | Updated: July 11, 2024 18:01 IST