नेवासा : नेवासा येथे नव्याने सुरू केलेली कामधेनू गोशाळा ही आध्यात्मिक व वैज्ञानिक संशोधन केंद्र बनावे. लोकांना जसे माती परीक्षण गरजेचे असते, तसे आता मती परीक्षणही गरजेचे झाले आहे, असे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले.
नेवासा येथे संत तुकाराम महाराज मंदिर संस्थान, नेवासा तालुका ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी, समर्पण फाउंडेशन व मिशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कामधेनू गोशाळा व शाश्वत सेंद्रिय शेती प्रकल्पाचा प्रारंभ गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. यावेळी महंत उद्धव महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, ऋषिकेश महाराज, अंकुश महाराज, रामनाथ महाराज पवार उपस्थित होते.
भास्करगिरी महाराज म्हणाले, गोमातेची उपयुक्तता आध्यात्मिक व वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध होऊन तिचा जीवनात अंगीकार व वापर झाला, तरच गोमातेची कत्तल थांबेल. ही गोशाळा केवळ गावाची नसून ती संपूर्ण तालुक्याची आहे. ती स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी समाजाने तन, मन, धनाने हातभार लावला पाहिजे. गोमातेच्या सेवेला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अधिष्ठान लाभावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक सुनील वाघ, डॉ.लक्ष्मण खंडाळे, महेश नवले, नगरसेवक सचिन नागपुरे, श्रीनिवास रक्ताटे, सुनील मोरे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.भारत करडक केले. सूत्रसंचालन रणछोडदास जाधव यांनी केले. आभार डॉ.करणसिंह घुले यांनी मानले.