अहमदनगर : अकोले पोलीस ठाण्यात काहीजण पोलिसांसमोरच शिवीगाळ, मारहाण, आरडाओरड करत असल्याची एक व्हिडिओ क्लिप गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याप्रकरणी मात्र अकोले पोलिसांनी कुणावरही काहीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाच दिवसांपूर्वी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान अकोले पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने तेथे तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना अरेरावी, दमदाटी, शिवीगाळ करत मारहाण केल्याचे व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहे. यावेळी पोलीस काहीच कडक कारवाई न करता केवळ भांडण सोडविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. पोलीस ठाण्यात बराच वेळ सुरू राहिलेला हा राडा सध्या अकोले तालुक्यासह जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे किरकोळ घटनांमध्ये थेट कारवाई करणारे पोलीस पोलीस अशा पद्धतीने राडा करणाऱ्यांना का अभय देत आहेत? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलीस ठाण्यातच राडा करणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नसल्याने यातून पोलीस दलाचीही प्रतिमा मलीन होत आहे.
दरम्यान, पोलीस ठाण्यात शिवीगाळ आणि मारहाण करणारी ती व्यक्ती कोण, तो पोलीस ठाण्यात कशासाठी आला होता, त्याचा उद्देश काय होता आणि पोलीस त्याला का वाचवत आहेत? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी याप्रकरणाची दखल घेणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.