अहमदनगर : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर परप्रांतीय कामगार परतले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली. सरकारने कडक निर्बंध लागू केल्याने सहाशेहून अधिक कामगारांनी गावचा रस्ता धरला. याशिवाय नोंद नसलेले अनेक कामगार बस, चारचाकी, दुचाकीने गावी निघून गले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कामगारांचे हाल झाले. अचानक लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कामगारांची धावपळ झाली होती. वाहतूक बंद होती. जीव मुठीत धरून कामगारांनी गाव गाठले. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर हाॅटेल, बांधकाम, फर्निचर, विविध कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार परत आले होते. परंतु, कोरोनाची दुसरी लाट येताच कामगारांनी कामावर जाणे बंद केले. काहीजण रेल्वेने आपल्या गावी निघून गेले. कामगारांना परत न जाण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. मागील लॉकडाऊनचा अनुभव वाईट होता. त्यामुळे त्यांनी यावेळी मालकांचेही एकले नाही. ते गावाकडे निघून गले. रेल्वेने जाणाऱ्या कामगारांची कामगार विभागाकडून माहिती घेतली गेली. या विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत ६०९ कामगार गावी निघून गेलेले आहेत. याशिवाय बस, दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांतून गेलेल्या कामगारांची संख्याही मोठी आहे. सकाळच्या वेळेत दुचाकीवरून अनेक कामगार गावाकडे निघालेले पहायला मिळतात.
......
कामगारांसाठी नियंत्रण कक्ष सुरू
सरकारने कामगार गावी परत न जाण्याचे आवाहन करीत त्यांच्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या काळातील कामगारांचे वेतन, आरोग्याच्या सुविधा, कामावरून कमी करणे यासह इतर समस्यांबाबत हा कक्ष कार्यरत आहे. कामगारांनी तक्रार दिल्यानंतर संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.