अहमदनगर : वादग्रस्त व सध्या निलंबित असलेला कोतवाली पोलीस स्टेशनचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याचा दुसऱ्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. आधीच्या गुन्ह्यातील पीडित महिलेनेच २० फेब्रुवारी रोजी पुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये वाघ याच्या विरोधात फिर्याद दिली होती.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सप्टेंबर २०२० मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात विकास वाघ याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पुन्हा २० फेब्रुवारी रोजी त्याच महिलेने वाघ याच्याविरोधात फिर्याद दिली. ११ फेब्रुवारी रोजी शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे व त्याच दिवशी रात्री साडेदहा वाजता मिस्किन मळा येथील झाडीत वाघ आपल्याला घेऊन गेला. तेथे लाकडी दांड्याने मारहाण करत तू माझ्याविरोधात दाखल केेेलेला गुन्हा मागे घे. मी तुला पीएसआयच्या परीक्षेत मदत करतो तसेच तुझे माझ्याकडे असलेले मंगळसूत्र परत करतो असे म्हणून वाघ याने अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी वाघ याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर १७ मार्च रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एस. बाकरे यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपी अजूनही फिर्यादीला व्हाॅटस ॲप मेसेजद्वारे धमकावत आहे, याबाबतचे सबळ पुरावे पोलिसांनी न्यायालयात दाखले केले आहेत, असा युक्तिवाद सरकारी वकील अर्जुन पवार यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाघचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.