अहमदनगर : चिमुरडा विठोबा व रुक्मिणी, मंगलकलश व तुळस डोक्यावर घेतलेल्या नऊवारी साडी परिधान केलेल्या मुली, पांढरे शुभ्र धोतर, शर्ट व टोपी अशा वेशात भगव्या पताका हाती घेतलेले बाल वारकरी मुले, टाळ-मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत बाल वारकऱ्यांची दिंडी शहरात ठिकठिकाणी निघाल्या. शालेय विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुुक्ताबाई, विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा धारण करून दिंडी काढली. भिंगार येथील बालक मंदिराच्या विद्यार्थ्यांनी टाळ,मृदंग, लेझिमच्या गजरात गावातून दिंडी काढली. या दिंडीने गावात भक्तिमय वातावरण तयार झाले. मुख्याध्यापिका एस.ए.राळेभात यांनी संतांचे महात्म्य सांगितले. हिंद सेवा मंडळ संचलित बागडपट्टी येथील सीतराम सारडा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकादशीनिमित्त वृक्ष दिंडी काढली. सकाळीच प्रसन्न वातावरणात हरिनामाचा गजर करत बालवारकरी मार्गस्थ होत होते. बागडपट्टी, सर्जेपुरा, नेता सुभाष चौक, रंगार गल्ली, दिल्लीगेट मार्गे जाऊन दिंडीचा समारोप झाला. गत आठ वर्षापासून शाळा दिंडी उपक्रम राबविते. शाळा यंदा १५ हजार बिया गोळा करणार असून त्या सामाजिक वनीकरणाच्या सीड बॅँकेस देण्यात येणार आहेत. लालटाकी येथील महाराष्ट्र बालक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी नागरिकांचे कुतुहल ठरली. माझे माहेर पंढरी.. तीर्थ विठ्ठल क्षेत्र..., पंढरीचा वास या भक्तीगीतांनी वातावरण भक्तिमय झाले. न्यू आर्टसच्या मैदानावर या बालवारकऱ्यांचे उभे रिंगण झाले. सांगळे गल्लीतील श्री समर्थ विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचीही दिंडी निघाली. वारकरी वेषातील मुलांची दिंडी पाहून शहरात जणू काही पंढरीच अवतरल्याचा भास होत होता. कपाळी गंध, बुक्का, गळ्यात तुळशीच्या माळा, हातात टाळ घेऊन विठू नामाचा जयघोष सुरू होता. मुलगा-मुलगी समान, पाणी आडवा पाणी जिरवा, प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा असा संदेश दिंडीतील बालवारकऱ्यांनी दिला. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळांचा आवाज, भजनाने समर्थ प्रशाळेचे मैदान दुमदुमून गेले. मुख्याध्यापिका परदेशी यांनी मुलांना मार्गदर्शन केले. बालमनावर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने शाळेने हा उपक्रम राबविला. अतुल अष्टपुत्रे , शेखर येमुल, ऋषीकेश हडप, वरद कोळपकर यांनी पांडुरंगाचा वेश परिधान केला होता. डोकेनगर (सावेडी) येथील डोके विद्यालय व साई विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही दिंडी काढली़ संस्थेचे सचिव बापूसाहेब डोके, मुख्याध्यापक आऱ डी़ क्षेत्रे आदी यावेळी उपस्थित होते़ सावेडीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनीही संत व वारकऱ्यांची वेषभूषा करुन दिंडी काढली़ मंजुषा कुलकर्णी, सहशिक्षिका अनिता देशपांडे, साधना कुकडे, मयुरा ठोंबरे, शुभांगी देशपांडे आदींनी दिंडीसाठी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)
अवघी दुमदुमली नगरी
By admin | Updated: July 10, 2014 00:34 IST