अहमदनगर : वाहन चोरी झाल्यानंतर तक्रार नोंदविण्यासाठी आता कोणालाही पोलीस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नाही. घरबसल्या वाहन चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने ‘वाहन चोरी तक्रार’ या नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅपवर जावून चोरी गेलेल्या वाहनाची माहिती नोंदविल्यास ती माहिती महाराष्ट्रभर लगेच प्रसारीत होणार आहे. त्यामुळे चोरी गेलेल्या वाहनाचा तपास लवकर लागण्यासाठी या अॅपची मदत होणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी हे अॅप विकसित केले आहे. ‘वाहन चोरी तक्रार’ या नावाचे अॅप मंगळवारी सायंकाळपासून कार्यान्वीत करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाने वाहन चोरी तक्रार नावाचे पोर्टल सुरू केले आहे. याच धर्तीवर जिल्हा पोलीस दलाने ही सेवा सुरू केली आहे. वाहन चोरी गेल्यानंतर कोणालाही घरी बसून, सायबर कॅफेत जावून किंवा स्वत:च्या मोबाईलवरूनही ही तक्रार नोंदविता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाने सुरू केलेल्या आॅनलाईन पोर्टलवर जावून नोंदणी करावी लागेल. वाहन चोरी तक्रार या संकेतस्थळावर जावून स्वत:चा मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार कार्ड नंबर, स्वत:चे नाव, स्वत:चा पासवर्ड निश्चित करून भरावा लागेल. तसेच तक्रारीची विनंती रजिस्टर करावी लागणार आहे.ओळख पटविण्यासाठी पासवर्ड आपण नोंदविलेल्या ई-मेलवर येईल. तो पासवर्ड बॉक्समध्ये भरून सबमीट करून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर नोंदविलेला मोबाईल क्रमांक, निश्चित केलेला पासवर्ड आणि व्हेरिफिकेशन कोड टाकून लॉगिन करू शकता. लॉगिन केल्यानंतर त्यामध्ये तुमचे जे वाहन हरवले आहे किंवा चोरीला गेले आहे, याबाबत तक्रार नोंदविता येईल.तक्रार नोंदविल्यानंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झाली आहे, त्या ठाण्यात ही तक्रार वर्ग होईल. तेथील पोलीस कर्मचारी तक्रारदाराशी संपर्क करतील. आवश्यकतेप्रमाणे जबाब नोंदवून घेतला जाईल. आवश्यकतेनुसार तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचे अपडेटस् तक्रारदाराला अॅपवरच पाहता येणार आहेत. चुकीची तक्रार दिल्यास कारवाई केली जाईल, असे शशिराज पाटोळे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
वाहन चोरीची तक्रार आता ‘अॅप’वर!
By admin | Updated: May 31, 2016 23:07 IST