अहमदनगर : कोपर्डी प्रकरणाचा दुसऱ्या दिवशी मंगळवारी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला़ तसेच जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, आढळा, श्रीरामपूर, राहुरी आणि कोपरगावातून मोर्चा निघाला़ कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आला़ या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत़ भाजपा वगळता सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली़ दुसऱ्या दिवशी मंगळवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (भिंगार युवक आघाडी), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भिंगार शहर राष्ट्रवादी, जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, स्टुडंन्ट पावर फे डरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ रिपब्लिकन पार्टीचे भिंगार युवक शहर अध्यक्ष अमित काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात विविध आंबेडकरी संघटना सहभागी होत्या़ ही घटना अत्यंत क्रूर असून, हा खटला जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावा़ त्याचबरोबर आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़ मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील क्षेत्रे, राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, संभाजी भिंगारदिवे, विशाल कांबळे, सिध्दार्थ आढाव आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता़कोपर्डीमुळे विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे़ परिणामी शाळांतील मुलींची संख्या घटू लागली असल्याचे समन्वय समितीचे सुनील पंडीत, अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचे निवेदनाव्दारे लक्ष वेधले़ तर शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आशा मगर यांनी सेके्रटहार्ट शाळेसमोर काळ्या फिती लावून निदर्शने केली़ समन्वय समितीने जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेऊन संख्या घटल्याचे निवेदनात नमूद केले असून, ही संख्या घटल्यास शाळा बंद आंदोलन करण्याचा इशाराही समन्वय समितीने दिला़
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांचा मोर्चा
By admin | Updated: July 20, 2016 00:23 IST