अहमदनगर : सन १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा ४४ वा विजय दिवस व या युद्धातील शहिदांना येथील आर्मर्ड कोअर सेंटर अॅण्ड स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले. ‘एसीसी अॅण्ड एस’चे मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांच्यासह सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व सैनिकांनी शहिदांना वंदन केले. नगरपासून ३ किमी अंतरावरील नगर-जामखेड रस्त्यावर ‘एसीसी अॅण्ड एस’चे मुख्यालय असून येथील कैवलरी युद्ध स्मारकावर बुधवारी हा सोहळा झाला. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी भारतीय सैनिकांनी अथक परिश्रमाच्या बळावर बांगलादेश युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला. यात अनेक सैनिकांनी प्राणाची बाजी लावल्यानेच हा विजय सुकर झाला. सर्वप्रथम रिसालदार मेजर उदयभान, त्यानंतर निवृत्त लेफ्टनंट जनरल व्ही. के. सेवल, लेफ्टनंट जनरल एन. पोली, ‘एसीसी अॅण्ड एस’चे मेजर जनरल प्रवीण दीक्षित (विशिष्ट सेवा मेडल) यांनी वीर शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. जवानांसह उपस्थितांनीही या वीरांना नमन केले. (प्रतिनिधी) या युद्धात ‘एसीसी अॅण्ड एस’चे मोठे योगदान आहे. युद्धात एसीसीएसचे सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांनी पश्चिम व पूर्व दिशेने कूच केले होते. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवत त्यांनी शत्रूशी निडरपणे मुकाबला केला. यात त्यांना बलिदान द्यावे लागले. या साहसाबद्दल त्यांना परमवीर चक्राने गौरविण्यात आले. याशिवाय १५ महावीर चक्र, ६० वीरचक्र यासह अनेक शौर्यपदक एसीसीएसला बहाल करण्यात आले. या शहिदांच्या स्मृती जपण्यासाठी एसीसीएसमध्ये सेंच्युरियन टँक ठेवण्यात आला आहे, जो लेफ्टनंट क्षेत्रपाल यांच्या युद्धताफ्यात सहभागी होता. भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी पूर्वी पाकिस्तानचा हिस्सा असलेल्या बांगलादेशने स्वतंत्र देशाची मागणी केली. त्याला पाकिस्तानचा विरोध होता. स्वतंत्र बांगलादेशसाठी तेथील नागरिकांनी बंडाचे निशाण फडकावले. ते चिरडून टाकण्यासाठी पाकिस्तानने बांगलादेशवर अत्याचार करणे सुरू केले. त्यामुळे बांगलादेशात हाहाकार उडाला. अनेक बांगलादेशी जीवाच्या आकांताने भारतात घुसू लागले. त्यामुळे भारताने या कारवाईत हस्तक्षेप करत पाकिस्तानला आव्हान दिले. ३ ते १७डिसेंबर असे चौदा दिवस हे युद्ध सुरू होते. अखेर भारतासमोर हात टेकवत १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी ले. जन. ए.ए.के. निमाजी यांनी आपल्या १३ हजार सैन्यानिशी भारतासमोर शरणागती पत्करली. एकीकडे भारताला विजय मिळाला, तर दुसरीकडे स्वतंत्र बांगलादेशचा जन्मही झाला.
वंदन शूरवीरांना
By admin | Updated: December 16, 2015 23:10 IST