अहमदनगर : राज्यात लॉकडाऊनच्या अनुषंगाने शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरत आहेत. भाजीपाला, किराणा अशी कारणे सांगत पोलिसांनाही चकवा देत नागरिकांनी संचारबंदीचा पुरता फज्जा उडवला आहे. पहिल्या दिवशी नगरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती.
राज्य सरकारने १५ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या अनुषंगाने कडक निर्बंध लावले आहेत. या काळात नागरिकांना संचारबंदी करण्यात आलेली आहे. गुरुवारी या निर्बंधाचा पहिला दिवस होता. परंतु पहिल्याच दिवसापासून रस्त्यावर, बाजारात, किराणा दुकानात सर्वत्रच नेहमीप्रमाणे गर्दी दिसत होती. पोलीस महत्त्वाच्या चौकात किंवा महामार्गावर उभे होते. मात्र, पोलिसांनाही गुंगारा देत नागरिक फुशारकी मिरवत इकडे-तिकडे फिरत होते. शहरातील विविध भागांत तसेच महामार्गावर दुचाकी, चारचाकी अशी वाहने बिनदिक्कत फिरत होती. कापड बाजारात सर्वच दुकाने बंद असल्याने तेथे शुकशुकाट जाणवत होता. मात्र, तेथील रस्त्यावरून लोक फिरताना आढळत होते.
दिल्ली गेट, कापड बाजार, जिल्हाधिकारी कार्यालय, डीएसपी चौक अशा काही महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता, पोलीस कारवाई करत होते, मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. पोलिसांनी पकडले तरी नागरिक भाजीपाला, किराणा, दवाखाना किंवा इतर काही कारणे सांगून आपली सुटका करवून घेत होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी संचारबंदीचा पुरता फज्जा उडाल्याचे समोर आले.
---------------
भिंगार नाल्यावर बंदोबस्त नाही
चांदनी चौकाच्या अलीकडे भिंगार नाल्यावर प्रत्येक लॉकडाऊनमध्ये पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र, गुरुवारी या ठिकाणी बंदोबस्त नव्हता. जामखेड तसेच सोलापूर महामार्ग असे दोन्ही महत्त्वाचे रस्ते याठिकाणी एकत्र येतात. या दोन्ही महामार्गावरुन गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहने शहरात येत होती. मात्र, बंदोबस्त नसल्याने त्यांना कोणीही अडविले नाही.
-------------
माळीवाडा, चितळे रोड, स्टेशन रस्त्यावर वर्दळ
माळीवाडा, चितळे रोड, स्टेशन रस्ता या भागात दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणात फिरत होते. या भागातील किराणा दुकाने, भाजीविक्रेते, फळविक्रेते, बँका सुरू असल्याने त्या ठिकाणी गर्दी दिसत होती.
-----------