केडगाव : कोरोनाच्या काळात सर्व नागरिकांना खऱ्या अर्थाने ऑक्सिजनची किंमत समजली असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन व बहिरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पंचवृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पवार म्हणाले, ऑक्सिजनची किंमत प्रत्येक नागरिकाला कोरोनाच्या काळात समजली. कोरोनात ऑक्सिजनअभावी माणसे हवालदिल झाली होती. सर्व देश हतबल झाला. त्यामुळे वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जय हिंद सैनिक फाऊंडेशनचे त्यांनी कौतुक केले.
आदर्श गाव पाटोद्याचे भास्करराव पेरे यांनी वृक्षलागवडीचे व्रत सर्वांनी अंगीकारण्याची गरज आहे. जन्माला आल्यानंतर प्रथमता ऑक्सिजन लागतो. त्यामुळे सर्व नागरिकांनी वृक्षलागवडीचे पवित्र काम करावे, असे आवाहन केले. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सेवा फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच बुऱ्हाणनगरमध्ये स्मारक होण्यासाठी सैनिक फाउंडेशनला जागा देण्यात येणार असल्याची माहिती दिली.
जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने बहिरवाडी येथील डोंगरांमध्ये ६२५ वृक्षांची लागवड केली. वड, पिंपळ, बेल, उंबर, कडुलिंब या पंच वृक्षांची लागवड केली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे यांनी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सरपंच अंजना येवले, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, तलाठी सरिता मुंडे, ग्रामसेवक योगेश साबळे, राजेंद्र दारकुंडे, संजय येवले, कैलास पटारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.