तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रमेश सावित्रा दिघे यांच्या संगमनेर रस्त्यालगत असलेल्या वस्तीवरून रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्याने हिरो होंडा कंपनीची दुचाकी लंपास केली. सोमवारी (दि. १५) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
ही दुचाकी (एम.एच.१७, आर-३८५३) उपसरपंच रमेश दिघे यांचा मुलगा जगदीश रमेश दिघे यांच्या नावावर आहे. याबाबत जगदीश रमेश दिघे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास तळेगाव दिघे शिवारातील नखुली वस्ती येथून वसंत काशिनाथ दिघे यांच्या दोन दुचाकींची चोरी करण्यात आली होती. या दुचाकी चोरीचा तपास लागलेला नसताना पुन्हा दुचाकी चोरीची घटना घडली. त्यामुळे तळेगाव दिघे परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.