अहमदनगर : जमिनीच्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून आरोपी करण्यात येऊ नये यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार सोन्याबापू मांडगे आणि पोलीस कॉन्स्टेबल चांगदेव आंधळे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. माळीवाडा येथील एका जागेच्या प्रकरणात शेख यांचा एका जागा मालकाशी व्यवहार झाला होता. त्यानुसार शेख यांनी जागा विकत घेतली होती. शेख यांचे साठेखत झाल्यानंतर माळीवाडा येथील एका दुकानदाराने त्याच जागेचे साठेखत केले. त्यामुळे नाव कोणाचे लावायचे यावरून हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. न्यायालयाने सदर दुकानदाराला नोटिसा बजावल्या होत्या. त्या नोटिसा न स्वीकारता दुकानदाराने कोतवाली पोलीस ठाण्यात शेख यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तकार दिली होती. या तक्रारीतून सुटका करायची असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे पोलिसांनी सांगितले. पैसे दिले नाहीत तर भाटिया प्रकरणात आरोपी करू, अशी धमकीही पोलिसांनी दिली. मात्र कोतवालीचे पोलीस कर्मचारी मांडगे व आंधळे यांनी दीड लाख रुपयांवर तडजोड केली. पैकी पन्नास हजार रुपयांचे टोकण सोमवारी देण्याचे ठरले. त्यानंतर शेख यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक संजीव म्हैसेकर, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस नाईक दयाराम दळवी, पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप पवार यांच्यासह आठ जणांच्या पथकाने सोमवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांनाही लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी) भाटिया प्रकरणात मयत जितेंद्र भाटिया यांची तक्रार न घेणार्या बेजबाबदार पोलिस अधिकार्यांमुळे कोतवाली पोलीस ठाणे चर्चेत आले होते. या लाचप्रकरणामुळे कोतवाली पोलीस ठाण्यातील भ्रष्ट्रचारही वेशीवर टांगला आहे.
दोन पोलीस लाच घेताना जेरबंद
By admin | Updated: June 27, 2023 11:06 IST