अहमदनगर : पोलीस मुख्यालयात पोलीस उपअधीक्षक (गृह) या पदावर अर्जुन लक्ष्मण भांड यांची तर शेवगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून सुनील भरत पाटील यांची बदली झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी या बदल्यांचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्या बदल्यांची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. पोलीस उपअधीक्षक (गृह) हे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त होते. श्याम घुगे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कारभार होता. त्यांची बदली झाल्यानंतर अनिता जमादार यांनी ही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर आचारसंहिता लागल्याने हे पद रिक्तच राहिले. औरंगाबाद शहर विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अर्जुन भांड यांची उपअधीक्षक या पदावर बदली झाली आहे. शेवगाव येथील उपविभागाचे पदाची अतिरिक्त जबाबदारी सध्या वाय.डी. पाटील यांच्याकडेच होती. शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सुनील भरत पवार यांची बदली झाली आहे. ते राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक आयुक्त या पदावर सध्या कार्यरत होते. दोन्ही अधिकारी लवकरच कार्यभार स्वीकारणार आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात दोन नवे डीवायएसपी
By admin | Updated: May 25, 2014 00:32 IST