लोणीमावळा : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील गाडे वस्तीवरील अनंथा बेलोटे यांच्या विहिरीमध्ये दोन महिन्याचा बिबट्याचा बछडा पडला होता. या बछड्याला गुरुवारी सायंकाळी वनखात्याच्या कर्मचाºयांनी सुखरूप बाहेर काढले. त्यास याच परिसरात सोडून दिले. गुरुवारी सायंकाळी बेलोटे यांच्या विहिरीमध्ये बिबट्या असल्याची वार्ता गावभर झाल्याने विहिरीभोवती नागरिकांची गर्दी झाली. मात्र विहिरीत एका कपारीचा आधार घेत एक दोन महिन्याचा बिबट्याचा बछडा बसल्याचे आढळून आले. हा बछडा चूकून विहिरीत पडला. मात्र पाणी कमी असल्याने तो पाण्याबाहेर येऊन कपारीत बसला होता. ज्येष्ठ नेते शिवाजीराव जाधव व सरपंच सीमाताई जाधव यांनी पारनेर येथील वनअधिका-यांशी संपर्क साधीत ही माहिती दिली. वनक्षेत्रपाल अश्विनी दिघे, वनरक्षक उमेश खराडे, वाघमारे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने पिंजरा विहिरीत सोडून या बछड्यास सुखरूप बाहेर काढले. या बछड्याची आई परिसरात असावी म्हणून त्यास येथेच सोडून दिले. यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव जाधव, उपसरपंच दत्तात्रय बेलोटे, निघोजचे उपसरपंच बाबाजी लंके, मंगेश गुंड, संकेत गुंड, मोहन गुंड, अनिल गुंड, नारायण माळी, सत्यवान गुंड, गणेश गुंड तसेच देवीभोयरे व वडगाव गुंड ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिका-यांना व कर्मचा-यांना सहकार्य केले.
दोन महिन्याचा बिबट्या विहिरीतून सुखरूप बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 14:56 IST