अकोले : तालुक्यातील पाडाळणे येथील खैरेवाडा बंधाºयात तीन अल्पवयीन शाळकरी मुली बुडाल्या. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला असून एक बचावली आहे. तिला नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शनिवारी(७ मार्च) दुपारी ही घटना घडली. पाडाळणे गावच्या शिवारात खैरेवाडी बंधारा आहे. शनिवारी दुपारी कोमल भिका अस्वले (वय १५), सुवर्णा रामनाथ शेंगाळ (वय १३), शुभांगी रामनाथ शेंगाळ (वय १५ ) या शाळकरी मुली शेळ्या चारण्यासाठी रानात गेल्या होत्या. दुपारी त्यांना तहान लागल्याने त्या बंधा-याकडे गेल्या होत्या. यावेळी तेथे पाणी पित असताना सुवर्णा शेंगाळ, कोमल शेंगाळ पाण्यात पडल्या. त्या बुडत असल्याचे पाहून तिची बहीण शुभांगी शेंगाळ हिने तिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. यावेळी तिने मदतीसाठी आरडाओरड केली. हे ऐकून जवळ असलेल्या तरूणांनी घटनास्थळी येऊन या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील कोमल व सुवर्णा या दोघी पाण्यात बुडून मयत झाल्या. परंतु शुभांगी हिला वाचविण्यास यश आले. शुभांगी शेंगाळ हिची प्रकृती चिंताजनक असून तिला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या बंधाºयात गवत वाढल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.
बंधा-यात बुडून दोन मुलींचा मृत्यू; एक बचावली, अकोले तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 19:16 IST