शेवगाव : तालुक्यातील बालमटाकळी येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चोरीच्या दोन दुचाकी मिळून आल्या आहेत.
ही कारवाई मंगळवारी (दि. ७) शेवगाव- गेवराई राज्यमार्गावरील बालमटाकळी येथे करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये राहुल हिम्मतराव शितोळे (वय १९, रा. बालमटाकळी, ता. शेवगाव) व कुमार भानुदास शिंदे (वय २३, रा. पानेवाडी, ता. घनसांगवी, जि. जालना) अशी आहेत. गावठी कट्टा खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांनी पोलीस कर्मचारी बी. बी. नाकाडे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ, प्रवीण बागुल, दिलीप राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांच्याकडील गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, दोन दुचाकी ताब्यात घेतल्या.