प्रेम पांडुरंग चव्हाण (वय ३७, रा. बाजारतळ, श्रीरामपूर) व आकाश राजू शेलार (वय २१, रा. चितळी, ता. राहता) अशी अटक आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, दोन इसम गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी श्रीरामपूर येथील नाॅदर्न ब्रँच येथे येणार आहेत. त्यानुसार कटके यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, काॅन्स्टेबल रवींद्र घुंगासे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, रोहित येमूल, चालक बबन बेरड आदींनी श्रीरामपूर येथे सापळा लावला. त्यानंतर काही वेळाने दोन इसम तेथे आले व संशयित नजरेने इकडे-तिकडे पाहू लागले. हेच आरोपी असल्याची खात्री झाल्यानंतर पथकातील पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे व सात जिवंत काडतुसे असा एकूण ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी तो जप्त केला. याबाबत दोघा आरोपींविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------
फोटो - १५एलसीबी
विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदा जवळ बाळगलेल्या दोन गावठी कट्ट्यांसह दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी श्रीरामपूर येथून जेरबंद केले.