टाकळी ढोकेश्वर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पारनेर तालुक्यातील बारा गावे तीन ऑक्टोबरपर्यंत बंद (लॉकडाऊन) ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी कोरोना स्थितीचा आढावा घेऊन या आदेशाची गावात कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश कोरोना ग्राम समित्यांना दिले आहेत.
पारनेर तालुक्यातील भाळवणी, ढवळपुरी, वडनेर बुद्रुक, निघोज, कान्हूर पठार, दैठणे गुंजाळ, वडगाव सावताळ, जामगाव रांधे, पठारवाडी, कर्जुले हर्या, वासुंदे या प्रमुख गावांसह सर्व गावांतील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मंगळवारी गमे यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयासह टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालय व कान्हूर पठार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली, तसेच आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे १०० बेड्सचे ऑक्सिजन सेंटर सुरू करण्याच्या सूचना गमे यांनी दिल्या. दुसरीकडे याच ग्रामीण रुग्णालयात कोरोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांवरही उपचार करण्यात यावेत, यासाठीही इतर विभाग कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा, नायब तहसीलदार गणेशा अधारी, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लांडगे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, पोलीस निरीक्षक घन:श्याम बळप यांच्यासह सरपंच अरुण खिलारी, दत्तात्रय निवडुंगे, किरण तराळ, ग्रामविकास अधिकारी रोहिणी तरवडे आदी उपस्थित होते.
---
कोरोना ग्राम समित्यांनी दक्ष राहावे
तालुक्यातील अनेक गावांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ग्रामपंचायत पातळीवर कोरोना ग्राम समिती कार्यरत आहे. त्यांनी दक्ष राहायला हवे. गावातील काही काेरोना रूग्ण घरातच उपचार घेतात. त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करावे, अशा सूचनाही ग्रामसेवक, कोरोना समितीला देण्यात आल्या. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी करण्याचे आदेश यावेळी गमे यांनी दिले.
----
रुग्ण कल्याण समितीची आयुक्तांकडे तक्रार...
पारनेर व टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी संख्या, आरोग्य सोयी-सुविधांचा अभाव आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब, गरजू रुग्णांना या रुग्णालयाचा फायदा नसेल, तर काय उपयोग, असा सवाल यावेळी काहींनी केला. या दोन्ही रुग्णालयांना पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी गमे यांच्याकडे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. बाळासाहेब कावरे व शरद झावरे यांनी केली.