अहमदनगर : गोवा राज्यात तयार झालेल्या विदेशी दारूची स्विफ्ट कारमधून अवैधरीत्या वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोघांना जेरबंद करत एकूण २१ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नगर-कल्याण महामार्गावरील भाळवणी शिवारात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. राधू गुंड (३९, रा.वडगाव गुंड ता. पारनेर) व प्रकाश बाबाजी शेळके (३४, रा.निघोज ता. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या दारू तस्करीचा मुख्य सूत्रधार राजू उर्फ राजेंद्र शिंदे हा फरार आहे.
राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीला उमाप, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक ऋषीकेश इंगळे, उपअधीक्षक संजय सराफ, पुणे भरारी पथकातील निरिक्षक दिगंबर शेवाळे, एन. बी. बनकर, दुय्यम निरिक्षक वर्षा घोडे, विजय सूर्यवंशी, महिपाल धोका, गोपाल चांदेकर, एस. व्ही. बोधे, एस. आर. गायकवाड, आर. व्ही. चव्हाण, व्ही. एन. रानमळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
-------------
गावठी दारू अड्यांवर छापे
दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने गेल्या दोन दिवसांत श्रीरामपूर, कोपरगाव व संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकून गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईत ४ हजार ८७० लिटर दारू तयार करण्याचे रसायन व ८३ लिटर तयार दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. एकूण १ लाख १६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत एकूण पाच गुन्ह्यांची नोंद करत साधना मोहन काळे व छाया सोनाजी शिंदे या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात येणाऱ्या काळात आणखी कडक मोहीम राबविणार असल्याचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.
........................
फोटो २४ कारवाई
ओळी- स्विफ्ट कारमधून दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींसह उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेले मुद्देमाल.