अहमदनगर : नगरच्या तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत नागवडे यांना दहा हजार रुपयांची, तर पाथर्डी पोलीस ठाण्यातील हवालदार अण्णा सोनवणे यांना दीड हजारांची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नागवडे हे अनेक दिवसांपासून व्यावसायिकांच्या रडारवर होते. अखेर शनिवारी ते जाळ्यात अलगदपणे सापडले. तक्रारदार यांचा मुरुमाचा ट्रक नायब तहसीलदार नागवडे यांनी सावेडी नाक्यावर पकडला होता. कायदेशीर कारवाईनंतर तक्रारदारांनी बँकेमध्ये चलनाद्वारे दंडही भरला होता. मात्र, तक्रारदाराचे वाहन सोडण्यासाठी चंद्रकांत विठ्ठलराव नागवडे (वय ५७, रा. आगरकर मळा, स्टेशन रोड) याने दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार याने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांना त्यांच्याच कार्यालयात पंचासमक्ष दहा हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी पळून गेले. कामासाठी आलेल्या नागरिकांनी त्यांची कागदपत्रांची शोधाशोध केली. एकाच आठवड्यात तहसील कार्यालयात झालेली ही दुसरी कारवाई आहे. चार दिवसांपूर्वी रुईछत्तीसी येथील मंडलाधिकारी तहसील कार्यालयातच लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला होता. नागवडेच्या अटकेनंतर अवघ्या चार-पाच तासांतच पाथर्डी येथे कारवाई झाली. पोलीस हवालदार सोनवणे याने दीड हजार रुपयांची लाच घेतली. त्यालाही अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नगरमध्ये नायब तहसीलदार, पाथर्डीत हवालदार जाळ्यात
By admin | Updated: March 18, 2024 16:11 IST