अकोले : सीताफळांच्या विक्री व्यवसायाला बरकतीचे दिवस दसरा दिवाळीच्या काळात असतात, मात्र पावसाच्या मध्यावरती श्रावणात थोड्या प्रमाणात सीताफळे बाजारात उपलब्ध होतात. सध्या विठे घाटात रस्त्याच्या कडेला दुतर्फा बसून आदिवासी सीताफळ विक्री करताना दिसतात. या सीताफळांची गोडी पर्यटकांनी चाखली आहे.
मुंबई मार्केटला २० किलोच्या कॅरेटला ७५० रुपयापर्यंत तर स्थानिक बाजारपेठेत किलोला ६० ते ७० रुपये भाव मिळत आहे. विठे घाटात एक वाटा ७० रूपयांंस विक्री होत आहे. नाशिक बाजारात १२० रूपये किलो सीताफळ विक्रीचा भाव बुधवारी होता. डोंगर रानातून सीताफळ गोळा करायची अन् विक्रीला बाजारात न्यायची असा आदिवासींचा दिनक्रम सुरु आहे. दिवाळीच्या सुटीत या व्यवसायास बरकत असते. अकोले-राजूर मार्गावरील विठे घाटात रस्त्याच्या कडेला काही वृद्ध व आदिवासी महिला सीताफळांची विक्री करण्यासाठी बसलेले असतात. ७० रुपयांना एक टोपलीचा वाटा असा विक्री भाव असून दिवसातून चार सहा वाटे विकले गेले तरी रोज सुटतो, असे आदिवासी शेतकरी सांगतात. कोरोनामुळे शाळा बंद असलेल्या काही शाळकरी मुले रानात सीताफळे गोळा करताना दिसतात.
भंडारदरा परिसरात भटकंतीसाठी येणारे पर्यटक मुद्दामहून थांबतात व सीताफळांची खरेदी करतात. काही शाळकरी चिमुकले सीताफळे विक्रीस मदत करताना दिसत आहेत. सीताफळांच्या विक्रीतून घर खर्चास हातभार लागण्यास मदत होत असल्याचे मुले सांगतात. तालुक्यातील ‘गर्दणी’ हे गाव सीताफळांचे आगार म्हणून ओळखले जाते. बाहेरगावचे व्यापारी येऊन सीताफळांची खरेदी करतात. गर्दणी प्रमाणेच विठा, लिंगदेव, रुंभोडी, बहिरवाडी, शेरणखेल, टाकळी, ढोकरी, आंबड, पाडाळणे भागात सीताफळाच्या झाडांची संख्या चांगली आहे.
................
बागायती जमीन शेतात संकरित सीताफळ वाण असलेले ६५० झाडे आहेत. तर डोंगर बरड माळाच्या १४ एकर शेतात नव्याने अडीच तीन हजार झाडे लावली आहेत. वरचा पाऊस व शेततळी या आधारावर सीताफळ बाग उभी आहे. यंदा फळ धरले आहे. सीताफळ पिकास फारसा खर्च येत नाही. रोगराई जास्त बाधत नसल्याने औषध फवारणीची गरज पडत नाही. ठिबकने पाणी दिल्यास अती अल्प पाण्यावर हे पीक येते.
- डी. बी. फापाळे, सेवानिवृत्त प्राचार्य, लिंगदेव
............
सीताफळांचे फायदे
सीताफळातील क व अ जीवनसत्वामुळे त्वचा मऊ निरोगी राहते.
जस्त- कॅल्शियम-मॅग्नेशियम मुळे केसांची निरोगी वाढ होते.
लोह व व्हिटॅमिन सी मुळे अनिमिया अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.
हिमोग्लोबिनमध्ये वाढ होते.
सीताफळांमधील नैसर्गिक साखरेमुळे वजन वाढण्यास मदत होते.
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर पोटॅशियम व मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवते.
दात हिरड्या मजबूत होतात.