अकोले: कळस बुद्रूक शिवारातील निमगाव वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री दरोडा पडला. यात तिघा भावांना मारहाण झाली असून जवळपास २५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ४ लाख ३९ हजाराचा ऐवज घेवून अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी पोबारा केला. मंगळवारी मध्यरात्री कळस बुदू्रक गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर रहदारीच्या निमगाव पागा रोडवर हा थरार घडला. दत्तात्रय रामनाथ वाकचौरे हे रात्री झोपण्याच्या तयारीत असतानाच बाहेरून त्यांच्या नावे हाक आली. ते घराबाहेर आले असता, अज्ञात व्यक्तीने ‘माझ्या गाडीतील पेट्रोल संपले आहे, तुमच्या गाडीतून देता का’, अशी विचारणा केली. पेट्रोल देण्यासाठी ते वळाले आणि सात ते आठ अनोळखी इसमांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारायला सुरुवात केली. गळ्यावर चाकू लावून घराचे दार उघडायला लावले. घरातील त्यांचे भाऊ पांडुरंग वाकचौरे व प्रवीण वाकचौरे यांनाही मारहाण केली. तिघांचे तोंड चिकटपट्टीने बंद करुन घरातील दोरीने त्यांना एका ठिकाणी बांधून ठेवले. महिलांना एका खोलीत डांबून ठेवले. खोलीतील कपाटातून रोख चाळीस हजार रुपये, एक सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल व महिलांच्या अंगावरील २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने घेवून दरोडेखोर पसार झाले. अदांजे ४५ मिनिटे हा थरार वस्तीवर चालला होतो. शेजारच्या वस्तीवरील दत्तात्रय यांचे चुलते आवाज ऐकून आले, त्यांनाही दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत डांबून ठेवले. चोरट्यांनी वस्तीवरील सर्व घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. चोरटे गेल्यानंतर पोलिसांना कळविले. (तालुका प्रतिनिधी)
दरोडेखोरांच्या मारहाणीत तीन जखमी
By admin | Updated: December 16, 2015 23:10 IST